सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग

गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यास प्रारंभ

| श्रीवर्धन | वार्ताहर |

सार्वजनिक बांधकाम विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीमंत पेशवे प्रवेशद्वारापासून जसवली फाट्यापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करून नूतनीकरण केले. परंतु, सदरचे डांबरीकरण करत असताना नागरिकांनी ज्या ज्या ठिकाणी गतिरोधक टाका, असे सांगितले त्या त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक टाकून ठेवले होते. परंतु, त्यावर कोणत्याही प्रकारे पांढरे पट्टे रंगविण्यात आले नव्हते. तसेच पुढे गतिरोधक आहे, असा फलकदेखील लावण्यात आलेला नव्हता.

गतिरोधक तयार केल्यानंतर त्या ठिकाणी पांढर्‍या रंगाचे पट्टे किंवा फलक नसल्यामुळे श्रीवर्धनमध्ये आजपर्यंत अनेक नागरिकांना अपघात होऊन आपला जीव गमवावा लागलेला आहे. शुक्रवारी सायंकाळी शेतकरी सन्मान कार्यक्रमाच्या वेळी सर्व पत्रकार एकत्र जमलेले असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर श्रीवर्धन येथील छायाचित्रकार प्रसाद नाझरे यांनी लेखी अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्यानंतर, रविवारी सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने श्रीमंत पेशवे प्रवेशद्वारापासून गतिरोधकांवरती पांढरे पट्टे रंगविण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version