अल्प प्रमाणात वालाच्या शेंगा बाजार दाखल
। पाताळगंगा । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यात वालाची शेती बहरली असून, वालाच्या शेंगा तुरळक ठिकाणी बाजारपेठेत दाखल झाल्या असल्यामुळे या शेंगा खरेदीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, वालाच्या शेंगा बाजारपेठेत मुबलक प्रमाणात येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
पावसाळा संपताच हिवाळा हा ॠतू सुरु होतो. आणि पावसाळी झालेल्या शेतीचे नुकसान शेतामध्ये कडधान्याची लागवड करून उत्पन्न मिळवले जाते. शिवाय, कडधान्य यांना पाण्याची आवश्यकता अल्प प्रमाणात असते. रात्रीच्या वेळी पडणार्या दवामुळे शेतीला पाणी आणि पोषक द्रव्य मिळत असते. यामध्ये मूग, हरभरा, मका, तूर, वालाच्या शेंगा असे अनेक प्रकारच्या कडधान्याची लागवड शेतकरी वर्ग करीत आहे. शिवाय वालाच्या शेंगा सुकून त्याचे वाल तयार होत असते. हेच वाल रोजच्या दैनंदिन जीवनात कडधान्य म्हणून वापरले जाते. शिवाय, या वालाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने शेतक-याला आर्थिक नफा मोठ्या प्रमाणात होत असतो या सर्व कारणावरून ग्रामीण भागात वालाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे शेतक-याला हिवाळी पिके ही अत्यंत महत्वाची वाटतात शिवाय अनेकांना रोजगार मिळत असतो.वालच्या शेगांची शेती बहरली असून सुगंध दरवळत आहे.