| पनवेल | प्रतिनिधी |
मानव तस्करीसारख्या गंभीर सामाजिक समस्येविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ, पनवेल येथे सकाळी वॉक फॉर फ्रीडम ही मूक रॅली उत्साहात पार पडली.
या रॅलीत महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रीय पातळीवर मानव तस्करी निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या चळवळीचा एक भाग म्हणून भारतातील 30 हून अधिक ठिकाणी ही रॅली एकाच वेळी आयोजित करण्यात आली होती. पनवेल येथील रॅलीत 100 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून मानव तस्करीविरोधातील लढ्यात आपली सामाजिक बांधिलकी व्यक्त केली.
या मूक रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष आर. व्ही. येले, मुख्य कार्यक्रम अधिकारी आकाश पाटील व एनएसएस कार्यक्रम अधिकारी रुपेश माने यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीदरम्यान सहभागी विद्यार्थी हातात मानव तस्करीची भयावह वास्तवता मांडणाऱ्या घोषणा असलेले फलक घेऊन एकाच रांगेत शांततेत मार्गक्रमण करत होते.
मूक स्वरूपातील ही रॅली तस्करीच्या बळी ठरलेल्या, आवाज गमावलेल्या पीडितांप्रती एकजूट आणि संवेदनशीलतेचे प्रतीक ठरली. रॅलीची सुरुवात महाविद्यालय परिसरातून होऊन खांदा कॉलनी मंदिरापर्यंत झाली व त्यानंतर पुन्हा महाविद्यालयात समारोप झाला. रॅलीपूर्वी सहभागी विद्यार्थ्यांना मानव तस्करीची लक्षणे ओळखणे, संशयास्पद बाबी लक्षात आल्यास तत्काळ मदत कशी मिळवावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 1098 (चाइल्डलाइन), 181 (महिला हेल्पलाईन) व 1930 (सायबर गुन्हे) या राष्ट्रीय मदत क्रमांकांची माहिती देऊन नागरिकांनी हे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्याचे आवाहन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, सध्या जगभरात सुमारे 49.6 दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीचे बळी ठरत आहेत. भारतात दररोज सरासरी 4 मुले मानव तस्करीची शिकार होत असून, दररोज 129 मुले बेपत्ता होत असल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालात आहे. अलीकडेच महाराष्ट्रातही अशा घटना उघडकीस आल्याने या विषयाची तीव्रता अधिक ठळक झाली आहे.







