व्हायचे होते क्रिकेटपटू, झाला धावपट्टू

महान ऑलिम्पियन बोल्ट क्रिकेटचा भक्त

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ऑलिम्पिक इतिहासातील महान धावपट्टू… आठ ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा धनी… 100 आणि 200 मीटरच्या शर्यतींमध्ये हुकूमत… अशी अनेक विशेषणे जमैकाचा माजी धावपटू उसेन बोल्टला देता येतील. मात्र ‘क्रिकेट माझ्या रक्तात असून क्रिकेटप्रेमाचा वारसा मला वडिलांकडून लाभला आहे. मुळात क्रिकेटपटू होण्याचेच माझे स्वप्न होते’, एखाद्या निस्सिम क्रिकेटप्रेमीप्रमाणे ही प्रतिक्रिया बोल्टने गुरुवारी व्यक्त केली.

क्रिकेटपटू होता आले नसले, तरी पुढील महिन्यात विंडीज-अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड कप टी-20 स्पर्धेचा ‘ॲम्बेसिडर’ होण्याचा मान त्याला मिळाला. ‘माझे बालपण क्रिकेटमय होते. मी जमैकात वाढलो, वडील दर्दी क्रिकेटप्रेमी, त्यामुळे हा खेळ माझ्या रक्तातच आहे, असे म्हणा’, असे बोल्ट सांगतो. वेगवान धाव, खिलाडूवृत्ती, विक्रमी कारकीर्द अन्‌‍ चेहऱ्यावर कायमच झळकणारे हसू यामुळे 2017मध्ये निवृत्त झाल्यानंतरही बोल्टची लोकप्रियता आजही कायम आहे. टी-20 हा क्रिकेटचा छोटेखानी प्रकार बोल्टला जास्त भावतो. ‘क्रिकेटमधील टी-20 हा प्रकार मला सर्वांत लाडका आहे. या प्रकारात वेग आहे. तुलनेत विंडीजमध्ये कसोटी क्रिकेटला फारशी पसंती नसते’, असे मत बोल्टने व्यक्त केले.

Exit mobile version