नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युद्ध

| नाशिक | प्रतिनिधी |

लोकसभेच्या नाशिक मतदार संघाचा तिढा अद्याप सुटत नसला तरी मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाशिकची जागा आमचीच असा दावा केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी मात्र नाशिकची जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रहच नाही तर हट्टसुद्धा आहे, असा प्रतिदावा केल्याने नाशिकच्या जागेवरून वाद टोकाला गेला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सुरुवातीला शिवसेनेने नाशिकच्या जागेवर दावा करताना शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तयारीला लागण्याच्या सूचना देतानाच विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करत महायुतीचा प्रोटोकॉल शिंदे यांच्याकडून तोडला जात असल्याच्या तक्रारी केल्या. त्याच्या दुसर्‍या दिवशीच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर आमचा देखील दावा असल्याचे सांगितले.

त्यानंतर मात्र नाशिकच्या जागेवरून वाद निर्माण झाला. छगन भुजबळ यांचे अचानक नाव चर्चेत आल्याने नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जमा होईल, असे बोलले जात होते. त्यानंतर मात्र अद्याप महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे नाशिकच्या जागेचा निर्णय घेतला नाही. भारतीय जनता पक्ष नाशिकच्या जागे संदर्भात एक पाऊल मागे आल्याचे दिसत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात मात्र नाशिकच्या जागेवरून वाक्‌युद्ध रंगले आहे.

Exit mobile version