वारे तलाठी कार्यालय चार वर्षांपासून बंद

शेतकर्‍यांची गैरसोय; कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यांतील वारे येथील महसूल विभागाचे तलाठी कार्यालय तब्बल चार वर्षांपासून बंद आहे. नियुक्तीवर असलेला तलाठी कार्यालयात येत नसल्याने शेतकर्‍यांची गैरसोय होत असून वारे येथील तलाठी कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

वारे येथील तलाठी सजा अंतर्गत वारे, पोशिर, मानकीवली, देवपाडा, पोही, कुरुंग, चिंचवाडी, या सात महसूल गावासह परिसरातील वाड्या पाड्या यांचा समावेश आहे. वारे येथील तलाठी कार्यलय मध्यवर्ती असल्याने या भागातील शेतकर्‍यांना सोयीचे आहे. मात्र चार वर्षांपूर्वी एका खाजगी जागेत असलेले कार्यालय इमारत मोडकळीस आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालया जवळील जिल्हा परिषदेच्या बंद अवस्थेत आलेल्या वर्ग खोलीत तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले.काही महिने सुरळीत चालू असताना 2020 वर्षीच्या अतिवृष्टीत जिल्हा परिषद वारे शाळेच्या इमारती खचून धोकादायक अवस्थेत आल्याने तेथे तलाठी कार्यलयास दिलेली जागा पुन्हा शालेय विदयार्थ्यांना आद्ययन करिता मोकळी करण्यात आली. तेव्हा पासून आजतागायत तलाठी सजा बंद असून शेतकर्‍यांना आपल्या कामासाठी मंडळ अधिकारी कार्यालय कळंब येथे जावे लागते. त्यामुळे या परिसरातील दुर्गम भागातील शेतकर्‍यांना सात आठ किलोमीटरची पायपीट करून कार्यलय गाठावे लागते त्यातच तलाठी कार्यालयात नसल्यास रिकाम्या हाती माघारी फिरावे लागीं असते.

शेतकर्‍यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात तलाठी कार्यालयाशी संबधित अनेक प्रकारची कामे असतात.त्यामध्ये आपल्या शेतीचा सातबारा उतारे, विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले, शाळा कॉलेजचे विदयार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी वेळोवेळी लागणारे दाखले,ज्येष्ठ नागरिकांचे दाखले या कार्यालयातूनच दिले जातात. मात्र मागील वर्षभरापासून हे कार्यालय कळंब येथे हलविल्याने या परिसरातील ग्रामस्थ शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. त्यातच कळंब येथील कार्यालयात वारे तलाठी सजाचे तलाठी कधीतरी उपस्थित असतात आणि त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. याची दखल घेऊन महसूल विभागाने त्वरित वारे येथेच कार्यालय सुरू करावे व शेतकर्‍यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वारे गावातील तलाठी कार्यालयास जागा उपलब्ध नसल्याने मागील काही वर्षांपासून कळंब येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना गैरसोयीचे होते. मात्र आता कार्यालयासाठी जागा उपलब्ध असून त्या संबंधी ठराव ही ग्रामपंचायतकडून दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा कार्यलय सुरू होऊ शकतो या संदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करून कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. योगेश राणे, सरपंच

आमच्या वारे गावातील कार्यालय तीन-चार वर्षांपासून बंद करण्यात आले आहे त्यामुळे येथील शेतकरी वर्ग, शालेय विदयार्थी, ज्येष्ट नागरिक यांची गैरसोय होत आहे. आपल्या कामासाठी तलाठी तात्यांना शोधावे लागत आहे .यासाठी महसून विभागाने लक्ष देऊन या समस्येचे निवारण करणे गरजेचे आहे. महेश म्हसे, स्थानिक कार्यकर्ते

Exit mobile version