| मेलबर्न । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीमध्ये सुरू झाला आहे. हा सामना ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर वॉर्नर पुन्हा कधीही कसोटी जर्सीत दिसणार नाही. डेव्हिड वॉर्नरयाच्या फेअरवेल कसोटीमध्ये डेव्हिड वॉर्नरचा प्रवेश खूपच आकर्षक होता . खरे तर या सामन्यापूर्वी तो राष्ट्रगीतासाठी मैदानात आला तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या तीन मुलीही उपस्थित होत्या. हे पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. सिडनी क्रिकेट मैदानावर उपस्थित प्रेक्षकांपासून क्रिकेटपटू आणि समालोचकांपर्यंत सर्वांनी टाळ्या वाजवल्या. डेव्हिड वॉर्नरने 11 जानेवारी 2009 रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 43 चेंडूत 89 धावा करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर 14 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने टी, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दमदार खेळी खेळल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी उत्कृष्ट सलामीवीर ठरला. जर आपण त्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला कळेल की, जेव्हापासून त्याने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण केले तेव्हापासून क्रिकेट विश्वात त्याच्या बरोबरीचा एकही कसोटी सलामीवीर नाही. त्याने गेल्या 13 वर्षात इतर कोणत्याही संघाच्या सलामीच्या फलंदाजा पेक्षा जास्त शतके झळकावली आहेत.
डेव्हिड वॉर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 111 सामने खेळले. यामध्ये त्याने 44.58 च्या सरासरीने एकूण 8695 धावा केल्या. या कालावधीत त्याने 26 शतके आणि 36 अर्धशतके केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकही झळकावले आहे. 335 ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. वॉर्नरने एकदिवसीय आणि टी मध्येही चांगली कामगिरी केली आहे. वॉर्नरने 161 एकदिवसीय सामन्यांमध्ये 45.30 च्या सरासरीने 6932 धावा केल्या आहेत आणि 99 टी सामन्यांमध्ये 32.88 च्या सरासरीने 2894 धावा केल्या आहेत.