शेकाप युवा नेते रमेश पाटील यांचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील रामराज विभागातील रामराज कुदे रस्त्याची दुरावस्था झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नाही तर शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा सुडकोली ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शेकापचे युवा नेते रमेश पाटील यांनी दिला आहे.
अलिबाग-रोहा रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नंतर नरमलेल्या सार्वजनिक बांधकमा विभागाने अलिबाग वावे या रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र या पुढील रस्ता संपूर्ण पणे सुस्थितीत करण्यात आलेला नाही. रामराज – कुदे या रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे. रस्ता गायब झाला असून फक्त खड्डेच राहिले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणार्यांना अतिशय हालअपेष्टा सहन करावी लागत आहे. याबाबतचे गार्हाणे शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी ताबडतोब सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जगदिश सुखदेवे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधत सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यावर मुख्य अभियंता सुखदेवे यांनी ही मागणी मान्य करीत दुरुस्तीला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पुन्हा एकदा शेकापच्या माध्यमातून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा चित्रलेखा पाटील आणि रमेश पाटील यांनी दिला आहे.
रामराज कुदे रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. आता सुरु असलेल्या यात्रांसाठी मोठया संख्येने मुंबईकर गावात येत असतात. मात्र खराब रस्त्याचा त्यांच्यासह सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्याची गरज आहे. तसे न झाल्याचे चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. – रमेश पाटील, सदस्य सुडकोली ग्रामपंचायत