स्मार्ट मीटर सक्ती केल्याने वीज ग्राहक संघर्ष समिती संतप्त
| नेरळ | प्रतिनिधी |
महावितरणकडून कर्जत तालुका वीज संघर्ष समितीला वेळोवेळी आश्वासने दिली जात आहेत. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने पुन्हा एकदा जन आंदोलन करायला लावू नका, असा इशारा संघर्ष समितीचे वतीने देण्यात आला. पावसाळा जवळ येऊ लागला असून पुढील दोन महिन्यात पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामे घ्यावीत आणि कोणत्याही स्थितीत स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे करू नये, असा इशारा कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे.
कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीमार्फत उपअभियंता तुकाराम केंद्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीचे समन्वयक ॲड. कैलास मोरे तसेच रंजन दातार आणि अनेक सदस्य उपस्थित होते. महावितरणचे उप अभियंता यांना निवेदन दिल्यानंतर चर्चा करताना कर्जत तालुक्यातील गावोगावांत विजेच्या तारा गेली 30 वर्षांहून अधिक जुन्या व जीर्ण अवस्थेत असल्याने अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. तसेच यामुळे वारंवार लाईट जात असते. या पार्श्वभूमीवर तातडीने जीर्ण तारा तसेच इतर विज उपकरणे बदलण्याबाबत निवेदन दिले आहे. पुढील दोन महिन्यात याची पूर्तता करण्यात यावी, तसेच यापुर्वी आम्ही वीज ग्राहकांनी ऑगस्ट 2024 मध्ये आठ दिवस साखळी उपोषणाचे आंदोलन केले होते. त्यावेळी ज्या वीज समस्या मांडल्या आहेत, त्यामध्ये जीर्ण तारा विजेचे खांब आणि इतर उपकरणे बदलण्याबाबत मागणी केली आहे.
यावर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी विजेचा शॉक लागून अनेक माणसे मृत्युमुखी पडले आहेत. तसेच अनेक जनावरे सुद्धा मृत्युम़ुखी पडली आहेत. या सर्व गोष्टी आपण वेळोवेळी मागणी केलेली कामे न केल्यामुळे घडलेल्या आहेत. निवेदनामार्फत केलेल्या मागण्या दोन महिन्याच्या आत सोडवल्या नाहीत, तसेच स्मार्ट मीटर बसविण्यासाठी सक्ती केल्यास आपणाविरूद्ध तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघर्ष समितीकडून देण्यात आला.
वीज ग्राहकांना दमदाटी
सक्तीने स्मार्ट बसवणार नाही. परंतु, गेल्या दोन महिन्यापासुन फॉल्टी मीटर तसेच वरीष्ठांचा दबाव आहे, पोलिसांना बोलावू अशी कारणे सांगून वीज ग्राहकांना दमदाटी करून स्मार्ट मीटर बसविण्यासाठी सक्ती करीत असल्याचे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीकडून निदर्शनास आणले.






