पुढील चार दिवस पावसाचे

रायगडला यलो अलर्ट

| पुणे | प्रतिनिधी |

पुढील चार दिवस म्हणजेच 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून, यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 ते 4 सप्टेंबरदरम्यान, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4 सप्टेंबरला यलो अलर्ट राहील. अकोला, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ‘असना’ चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूरवर गेले असून, ते ईशान्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावर घोंघावत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बंगालच्या उपसागरात एक वादळी प्रणाली निर्माण झाली आहे. ही वादळी प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा दरम्यान मध्यरात्री धडकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे मध्य आणि उत्तर द्वीपकल्पीय भारतात पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी सांगितले. पश्‍चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी 1 ते 2 सप्टेंबरदरम्यान आणि विदर्भात 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Exit mobile version