अंकुश कातकरी यांची कोकण आयुक्तांना लेखी तक्रार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
सात दिवसांत न्याय न मिळाल्यास कोकण आयुक्तांच्या कार्यालयासमोर कुटुंबियांसह आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा अंकुश कातकरी यांनी दिला आहे. उरण तालुक्यातील चिर्ले येथील रहिवासी संजय पाटील यांच्याकडे अंकुश कातकरी हे 15000 रुपयांच्या मासिक पगारावर केअर टेकर म्हणून काम करीत आहेत. या दरम्यान ते आपल्या कुटुंबियांसह जांभुळपाडा येथील संजय पाटील यांच्या शेतजमिनीच्या ठिकाणीच वास्तव्य करीत होते.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणी तक्रारीनंतरही 37 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, उरण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने अखेर अंकुश कातकरी यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग व समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
केअरटेकर म्हणून शेतजमिनीची कामे, रखवाली करीत असताना 16 मे 2024 रोजी अचानक संजय पाटील यांचे नातेवाईक निग्रेश पाटील व त्यांच्यासोबत आलेले सात-आठ निकटवर्तीय घरात घुसले. घरातील सामान, तयार जेवण घराबाहेर फेकून दिले. शिवीगाळ,जीवे ठार मारण्याची धमकी देत घरातून हुसकावून लावले. संजय पाटील व त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये जमीनीवरुन वाद असल्याची जराही कल्पना आपणास नव्हती. शिवाय, त्यांच्यातील वादाशी कोणताही संबंध नसतानाही शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घरातुन हुसकावून लावल्यानंतर जीव मुठीत घेऊन कुटुंबियांसह सामान-सुमान घेऊन गावी निघून गेलो.
सात दिवसात संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. मात्र, त्यानंतरही न्याय न मिळाल्यास कोकण आयुक्तांच्या कार्यालयासमोर कुटुंबियांसह आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग व समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांच्याकडे अंकुश कातकरी यांनी लेखी तक्रारी अर्जाद्वारे दिला आहे.