मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील साळाव येथील जे.एस.डब्लू कंपनीने स्थानिकांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात, अन्यथा मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा कंपनी व्यवस्थापनास देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन कंपनी व्यवस्थापक भानू प्रसाद यांना देण्यात आले आहे.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, माजी सरपंच मधुकर पाटील, तालुका सहचिटणीस सी.एम.ठाकूर, शरद चवरकर, माजी सभापती चंद्रकांत कमाने, माजी सभापती बाबू नागावकर, किशोर गायकर, दिलीप चवरकर, मिठेखारचे माजी सरपंच अशोक चवरकर, अशोक तांबडे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिकांच्या अनेक मागण्या पूर्ण होण्यासाठी 13 जुलै रोजी कंपनीकडे निवेदन देण्यात आले होते. परंतु कंपनी प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे बुधवारी (दि.17) स्थानिकांच्या वतीने पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. याबाबत कंपनीने कोणताही प्रतिसाद न दिल्यास मोठे जनआंदोलन स्थानिक नागरिकांना घेऊन करण्यात येईल असा इशारासुद्धा त्यावेळी देण्यात आला.
यावेळी कंपनी व्यवस्थापक भानू प्रसाद यांनी सांगितले की, स्थानिकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर कंपनी व्यवस्थापनासोबत सभा घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर कंपनीने स्थानिकांच्या मागण्या मंजूर होण्यासाठी निर्णय घेणार्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांनी केली आहे.
जे.एस.डब्लू कंपनीकडून 150 एकर जमीनीचा वापर केला जात नाही. त्यामुळे त्या जमिनी पुन्हा द्याव्यात. तसेच प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर नोकरीत समाविष्ठ करण्यात यावे. ज्यांना नोकर्या देता येत नसतील त्या प्रकल्पग्रस्तांना मानधन द्यावे. याशिवाय कंपनीच्या सीएसआर फंडातील कामे कार्यन्वित करण्यात यावी.
– मनोज भगत, शेकाप जिल्हा सहचिटणीस