| पेण | वार्ताहर |
तालुक्यातील आय.एस.ओ. ग्रुप ग्रामपंचायत दुष्मि- खारापाडामधील संतप्त आदिवासी आपल्या न्याय हक्कांसाठी गुरुवारी (दि.9) पेण पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी आणि खारपाडा सावरोली राज्य मार्ग ते वडमालवाडी आदिवासी वाडी बनविण्यात यावे या मागण्यांसाठी येथील आदिवासी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा धडकणार आहेत. याबाबत आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करणार्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने पेणचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राऊत यांच्यासह दुश्मी ग्राम पंचायतीच्या सरपंचांना निवेदन दिले आहे.
खारपाडा सावरोली राज्य मार्ग ते वडमालवाडी आदिवासी वाडी रस्ता तयार करण्यात यावा आणि जल जीवन मिशनमधून सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीतून पाण्याचे उद्भव स्त्रोत घेऊन वडमालवाडीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी या मागणीसाठी गट विकास अधिकारी, पंचायत पेण यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याच सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, नर्मदा तुळशीदास वाघे, रंजना राजू वाघे, अनिता संतोष वाघे, चंद्रभागा काशिनाथ पवार, पुष्पा रामा वाघे, यांच्यासह वडमाळवाडीतील आदिवासी बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.