16 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा

तर संपूर्ण जिल्ह्यात मिनिडोअर बंदचा निर्धार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रलंबित मागण्यांची पुर्तता करावी या मागणीसाठी रायगड जिल्हा विक्रम, मिनीडोअर चालक, मालक संघाने साखळी उपोषण, आमरण उपोषण केले, जलसमाधी आंदोलन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला टाळे ठोके आंदोलन अशा अनेक प्रकारची आंदोलने केली. परंतू सरकारकडून फक्त आश्‍वासने देण्यात आली. प्रत्यक्षात मागण्या पुर्ण करण्यास सरकार उदासीन ठरला. त्यामुळे संतप्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील मिनीडोअर संघटनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. मिनिडोअर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी स्वतःच्या रक्ताने जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दिले आहे. येत्या 16 मार्च पुर्वी आमचे प्रश्‍न मार्गी लागले नाही, तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पदमश्री बैनाडे यांना निवेदन देण्यात आले आहे. अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या आंदोलनासाठी या दिवशी संपुर्ण मिनीडोअर सेवा बंद करणार असल्याचे ही कार्याध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्र, परिवहन प्राधिकरण व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रायगड क्षेत्रातील असलेली जुन्या तीनचाकी सहा आसनी वाहनांची वयोमर्यादा 20 ते 25 वर्षाची वाढ करून जुन्या वाहनांना सरसकट दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून मिळावी.बीएस सहा मानांकनातील बदली वाहन इंधन म्हणून सीएनजी वापरण्यास मान्यता मिळावी. कोरोना काळात परवानाधारक तीन चाकी रिक्षा चालकांना लागू झालेले सानुग्रह अनुदान देण्यात यावा. अशा अनेक मागण्यांसाठी मिनीडोअर चालक मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण, व साखळी उपोषण सुरु केले होते. यापुर्वी धरमतर खाडीमध्ये जलसमाधी करण्याची भुमिका घेतली होती. तसेच पेण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोके आंदोलन करण्याच्या मार्गावर होते. त्यावेळी वेळोवेळी जिल्हा प्रशासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फक्त आश्‍वासन देण्याचे काम केले. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नाही. त्यामुळे रायगड जिल्हा चालक, मालक मिनीडोर संघाचे जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी आंदोलन तीव्र करण्याची भुमिका घेतली आहे. स्वतःच्या रक्ताने पत्र लिहले. ते पत्र सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पदमश्री बैनाडे यांना दिले आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, दिपक म्हात्रे, शशी पाटील, विकास पारंगे, प्रभाकर कासकर, राजू भंडारी आदी चालक, मालक उपस्थित होते.

Exit mobile version