पुढच्या पाच दिवसात रायगड सह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

यलो अलर्ट जारी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यानंतर पुन्हा रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज दक्षिण कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच पुढील काही तासात याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुढील पाच दिवस राज्यात हीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

शाहीन चक्रीवादळ तीव्र
अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीनं चक्रीवादळ तीव्र झालं असून त्यानं ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यापासून देशात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. मस्कटसह अनेक शहरं जलमय झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने रस्ते जलमय झाले असून रस्त्यांवरील वाहने पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी पावसाचा जोर अद्याप कायम असून शहरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रीय होण्याची शक्यता

हे संकट कमी होत नाही तोच केरळजवळ अरबी समुद्रात एक नवीन संकट उद्भवण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवस केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडले, असा इशारा देण्यात आला आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात निर्माण झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा पूर्वेकडे सरकरण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

महाराष्ट्रात 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना या 10 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये.तसेच लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस दक्षिण कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Exit mobile version