सार्वजनिक बांधकाम खात्यास दिले निवेदन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
राजपुरी कोळीवाडा परिसरात मुख्य गटाराचे पाणी समुद्रात जावे यासाठी साकवाचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. प्रवासी वर्गासाठी एक उत्तम सोय प्रदान करण्यात आली होती. परंतु, संबंधित ठेकेदाराने संपूर्ण काम पूर्ण न करता काही काम प्रलंबित ठेवल्याने याबाबत श्री महालक्ष्मी मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय गिदी यांनी हरकत घेतली आहे.
येत्या काही दिवसात जर या साकवाचे काम परिपूर्ण न केल्यास राजपुरी खोकरी मार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना रीतसर निवेदनाने कल्पना देण्यात आली आहे. हा मार्ग बंद केल्यास राजपुरी, माझेरी व मुरुडमधील नागरिकांना रोहा येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग बंद पडणार आहे. त्यामुळे असंख्य प्रवासी वर्गाची कुचंबणा होणार आहे. याबाबत मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही करून पूर्तता करावी, अशी प्रवासी वर्गाकडून मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात विजय गिदी यांनी मागणी केली आहे की, साकवाचे बांधकाम झाल्यानंतर ठेकेदाराने मुख्य पाणी जाण्याच्या मार्गावर दगड, माती, रॅबीट तसेच ठेवल्यामुळे पाणी साचून रहात आहे. त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहेत. त्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे समुद्राच्या बाजुला खोदकाम करून दगड, माती तशीच ठेवली आहे. त्यामुळे मच्छिमारांच्या नौका पाण्याच्यावर किंवा समुद्राच्या आत लोटताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मच्छिमारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता आगामी काळात म्हणजेच एप्रिल महिन्यात हनुमान जयंती, श्री गणेश उत्सवाचे कार्यक्रम, गावातील सामुदायिक लग्न सोहळ्यातील साखरपुडे, सामुदायिक लग्नातील हळदी कार्यक्रम, सामुदायिक विवाह सोहळा, असे कार्यक्रम सपन्न होणार असून यावेळी राजपुरी कोळीवाडा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे क्रमप्राप्त आहे.
तरी येत्या आठ दिवसाच्या साकवाचे राहिलेले काम व मुख्य प्रवाहाच्या समोरील दगड, माती, रॅबीट उचलून त्याठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात यावे. जर का सदर काम वेळेत झाले नाही तर रहदारी रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात येईल, असा इशारा चेअरमन विजय गिदी यांनी सार्वजनिक बांधकाम मुरुड यांना दिला आहे.






