पाताळगंगा नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

। रसायनी । प्रतिनिधी ।
कोकण पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केले असून भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रविवार आणि सोमवार अशा दोन दिवस रसायनी पाताळगंगा परिसरात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले असून पाताळगंगा नदीने दुपारी धोक्याची पातळी ओलांडल्याने रसायनीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रसायनी पाताळगंगा परिसरात मुसळधार पावसामुळे बर्‍याच भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. पाताळगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आपटा गावात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. तर रसायनीमार्गे आपटा हा मार्ग सखल भागात पाणी साचल्याने बंदच होता.

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांत पाणी शिरल्याचे दिसून आले तर एमआयडीसी रस्ता पाण्याखाली गेला होता. तर कॅनरा बँक, रसायनी पोलीस ठाण्यात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले.तसेच खाने आंबिवली स्टेट बँक, मोहोपाडा बॅक ऑफ इंडिया समोर, सेबी वलण ते एमएसीबी कार्यालयात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. परिसरातील अनेक भागात शेतातील भात लावणी वाहून गेली. पावसाचा जोर कायम राहिल्याने रसायनी पाताळगंगा परिसरातील नदी, तलाव, विहीर,नाले पाण्याने भरून गेली. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पाऊस असाच सुरू राहिल्यास पाताळगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून पुरपरिस्थिती निर्माण होईल, यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version