। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानच्या डोंगरातील बिबट्याचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी बिबट्या आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात घाटात देखील बिबट्याने टॅक्सी चालकाला दर्शन दिले असून धसवाडी मधील बैलाची शिकार केली आहे. दरम्यान, बिबट्याचा वावर माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगल भागात वाढला असून स्थानिकांनी आपली जनावरे बाहेर बांधून ठेवू नये आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये अशी दवंडी पिटण्यास वन विभागाने सुरुवात केली आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेडीसगाव पासून बेकरे पर्यंतच्या जंगलात हा बिबट्या रात्री फिरत असल्याचे वनविभाग कडून सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या आरोळ्या आणि कुत्र्यांंचे भुंकणे असे प्रकार सुरु आहेत. सध्या नेरळ ग्रामपंचायत भागातील लव्हाळवाडी, टपालवाडी,आंबेवाडी, तसेच जुमाप्पटी आणि बेकरे परिसर तसेच वांगणी जवळील बेडीसगाव मधील नऊ आदिवासीवाड्यांच्या आसपास असलेल्या जंगल भागात बिबट्याचा वावर आढळून आला आहे.
4 डिसेंबर रोजी नेरळ हद्दीमधील धसवाडी भागातील शेतकरी हरिदास लक्ष्मण आखाडे यांच्या बैलाटी शिकार बिबट्याने केली आहे. नेहमी प्रमाणे पहाटेच्या सुमारास चरायला सोडलेल्या जनावरांपैकी एका बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले आहे.पहाटेच्या वेळी धसवाडी पासून 700 मीटर अंतरावरील जंगलात सकाळी गवत कापण्यासाठी गेलेले असताना हरिदास आखाडे यांना आपल्या बैलावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे आढळून आले. बिबट्याने त्या बैलाचा एक कान कापून नेला असून त्या बैलाच्या पाठीमागील शेपटीच्या बाजूला मांस ओढून नेले होते.त्याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल उमेश जंगम,वनपाल एस एच म्हात्रे यांनी घटनस्थळाची जाऊन पंचनामा केला. त्यानंतर तेथे नेरळ पशु वैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले आणि तेथे पंचनामा आणि शव विच्छेदन करण्यात आले. त्या बैलाच्या मृत्यूबद्दल वन विभागाने शेतकर्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे,त्यात 30 हजाराचे नुकसान शेतकरी आखाडे यांचे झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नेरळ माथेरान टॅक्सी सेवा करणार्या वाहनचालक राकेश पाटील हे 5 डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता माथेरान येथून नेरळ येथे टॅक्सी घेऊन येत होते.त्यांना नेरळ च्या माथेरान नाक्यापासून जेमतेम 200 मीटर अलीकडे लव्हाळवाडी भागातून थेट घाट रस्त्यावर आलेला बिबट्याच्या गाडीच्या प्रकाशात रस्त्यावर काही काळ थांबला.त्यानंतर मार्ग न दिसल्याने बिबट आल्या पावली पुन्हा लव्हाळावाडी कडे खाली उतरून परत गेला.दरम्यान, मनुष्य वस्तीपर्यंत बिबट्याची धाव पोहचली असल्याने शेतकर्यांनी आपली जनावरे रात्रीच्या वेळी घराबाहेर ठेवू नये अशी सूचना वन विभागाकडून केली जात आहे. तर रात्रीच्या वेळी कोणत्याही कामासाठी घराबाहेर पासून नये अशी दवंडी वन विभागाकडून बेडीसगाव,वाघिणीवाडी,लव्हाळवाडी,जुम्मापट्टी,धसवाडी,टपालवाडी,ममदापुर वाडी भागात दिली जात आहे.