कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प कागदावरच?

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावचे शहरीकरण, नागरीकरण झपाट्याने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्‍या घनकचर्‍याचा प्रश्‍नही तितकाच मोठ्या प्रमाणात गंभीर बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्‍या या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी माणगाव नगरपंचायतीने अनेकवेळा वेळोवेळी प्रयत्न केले. मात्र हा कचरा उचलण्यासाठी टेंडर काढून एका ठेकेदाराला हे काम दिले. हा कचरा काही कामगारामार्फत उचलून तो डम्पिंगग्राउंडवर टाकला जातो. तसेच या ठिकाणी दुर्गंधीही पसरली आहे. माणगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉ.पक्षाने नगरपंचायतीत सत्ता आल्यास माणगाव नगरी स्वच्छ व सुंदर करून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याचे जाहिरनाम्यातून जाहीर केले होते. त्या जाहिरनाम्याची वचनपूर्ती नगरपंचायतीकडून अद्यापही झाली नाही त्याबाबत नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत असून खतनिर्मिती प्रकल्पाची वचनपूर्ती कचर्‍यात गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहे. माणगाव नगरपंचायतीने ईटेंडरद्वारे कचरा उचलण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्या ठेकेदारामार्फत कर्मचारी नेमून हा कचरा गोळा केला जातो. तसेच या कचर्‍याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने या कचर्‍याचे वर्गीकरण सुका, ओला व प्लास्टिक व बाटल्या बाजूला करून माणगाव येथील नगरपंचायतीच्या जागेतील पाच एकर असणार्‍या डंपिग ग्राउंडवर विल्हेवाट लावून खत निर्मिती करावयाचे प्रयोजन होते ते आश्‍वासन अखेर आश्‍वासनच ठरले. माणगाव नगरपंचायतीला डंपिग ग्राउंडची भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले आहेत. त्यानुसार शासनाची पाच एकर जागा नगरपंचायतीला उपलब्ध करून दिली असल्याचे समजते. त्यामुळे नगरपंचायतीला भेडसावणारा प्रश्‍न कायमचा निकाली निघाला. मात्र हा कचरा उघड्यावर टाकल्याने कचर्‍याचा प्रश्‍न अधिकच गंभीर बनला असून खतनिर्मिती प्रकल्पाचा माणगावात अखेर बोजवाराच उडाला आहे.

Exit mobile version