नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे विजेचा अपव्यय

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

ऊर्जेची बचत करणे ही काळाची गरज असतानाच श्रीवर्धन नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात मात्र विजेचा मोठा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर पथदिवे दिवसात ही सुरूच राहत असल्याचे समोर आले आहे. या बेजबाबदारपणामुळे रोज हजारो युनिट विजेची उधळपट्टी होत असून, नगरपरिषदेच्या तिजोरीवर आणि अनुषंगाने करदात्या नागरिकांच्या खिशावर नाहक आर्थिक बोजा पडत आहे. एकीकडे सर्वसामान्यांना वीज बचतीचे धडे दिले जातात, तर दुसरीकडे प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे सार्वजनिक मालमत्तेची अशी उघडउघड नासाडी सुरू आहे. स्वयंचलित टाइमर सिस्टीममधील बिघाड किंवा कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणी लक्ष देऊन विजेची होणारी ही उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version