किडींवर क्रॉप-सॅप ॲपद्वारे वॉच

रोग नियंत्रणासाठी कृषी विभाग राहणार दक्ष

| तळा | वार्ताहर |

खरीप हंगामात भात पिकांवर किड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे उत्पन्नापेक्षा कीड नियंत्रणावरच अधिक खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येते हा प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या (क्रॉप-सॅप) ॲपद्वारे किडींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्यात येत आहे. यातून कीड-रोगांचे नियंत्रण करणे सुलभ होणार आहे. तळा कृषी विभागाच्यावतीने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प संपूर्ण तालुक्यात राबविला जात आहे.तालुक्यातील प्रामुख्याने भात पिकांसाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामुळे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे (एनआयसी) यांनी विकसीत केलेल्या संगणक प्रणाली व मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून पिकांवरील किड व रोगावरती बारीक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यामातून ऑनलाईन माहिती संकलित केली जात आहे.

स्थानिक कृषी विभागाचे कर्मचारी यांच्याकडून भात पिकांच्या प्लॉटचे निरीक्षण करून त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून ॲपमध्ये अपलोड करण्यात येत आहेत या माहितीचे संकलन एनआयसी पुणे येथे करण्यात येते त्यानंतर कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ संकलीत माहितीचे विश्लेषण करून तालुकानिहाय उपाययोजना सुचवणार आहेत.जर किड व रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास नियंत्रणासाठी असलेल्या सूचना प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जातील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद कंबळे यांनी दिली आहे.या प्रकल्पासाठी कृषी विभागाने तळा तालुक्यामध्ये फिक्स प्लॉटसाठी शेणाटे, खांबवली, कुंभळे, वरळ, तळेगांव, कासेखोल, महागांव, मालाठे, वावे हवेली, साईधाम, उसर खुर्द, चरई बु या 14 गावांची निवड केली असून या गावांमध्ये प्रत्येकी दोन फिक्स प्लॉट निवडण्यात आले आहेत या प्रमाणे 28 फिक्स प्लॉटचे प्रत्येक आठवड्याला जागेवरती जाऊन मोबाईल अँपद्वारे निरीक्षणे नोंदवली जात आहेत.

निरीक्षण घेत असताना प्लॉटमध्ये एक बाय एक चौरस मीटर आकाराचे पाच चौरस तयार करून त्यामधील चार चुडांचे निरीक्षण या प्रमाणे एक प्लॉट मधील 20 चुडांचे निरीक्षण करून किड व रोगाची माहिती संकलीत केले जाते. तालुक्यातील इतर गावांमध्ये रँडम पद्धतीने निरीक्षण घेण्यात येत आहेत भात पिकासाठी 14 नोव्हेंबर पर्यंत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात खोककिडा, गादमाशी, लष्करी अळी, तुळतुळे, निळे भुंगुरे, हिस्पा, पानावरील करपा, पर्णकोष करपा आणि जीवाणूजन्य करप्याचे निरीक्षण करून त्याचे मोबाईलद्वारे फोटो काढून ॲपद्वारे एनआयसीकडे पाठविले जात आहे. अश्या प्रकारे विविध किडींवर कृषी विभागाचे लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे कोणत्या भागात नेमका कोणता रोग किंवा कीड आली आहे हे कळण्यास तात्काळ मदत होईल. तसेच त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या हे कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ सांगणार आहेत. त्यामुळे वेळेतच किडी व रोगाचे नियंत्रण करून कीड नियंत्रणासाठी होणारा मोठा खर्च टाळता येणार आहे.

Exit mobile version