माथेरानवरील पाणीसंकट टळलं

नवीन पंप आल्याने सुरळीत पाणीपुरवठा

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरान शहराला होणारा पाणीपुरवठा नेरळ येथील उल्हास नदीतून होत होता; परंतु वॉटर पॉईप येथील पंप खराब झाल्याने माथेरानला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत होता. पर्यायाने माथेरानमधील शारलोट तलावातून पाण्याच्या उपसा होत असल्याने या तलावाची पाणी पातळी कमी होत होती. त्याचा थेट परिणाम माथेरानमधील पर्यटन हंगामात होणार होता.

माथेरानमधील माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांनी वेळोवेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती केली. तर, स्थानिक आमदारांनीदेखील यात लक्ष घालून अधिकर्‍यांना सूचना केल्या होत्या. याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून गंभीर दखल घेत उपअभियंता गरूड, मॅकेनिकल अभियंता राठोड तसेच कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, माथेरान पाणीपुरवठाची देखभाल करणारे राहुल दासरे यांनी परिश्रम करून माथेरान पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पंपाकरिता आग्रह धरला होता. अखेर तो नवीन पंप आला असून, तो लवकरच बसवण्यात येणार आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली, त्यामुळे माथेरानचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

Exit mobile version