| पनवेल | प्रतिनिधी।
धरणांमधील घटता जलसाठा, वाढती उष्णता आणि हवामान विभागाने व्यक्त केलेल्या एल-निनो व आयओडीच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने आपल्या पाणीपुरवठा क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात गुरुवार (दि.28) पासून लागू होणार असून पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.
सिडको क्षेत्राला हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या पाताळगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जलाशयांतील पाण्याची बाष्पीभवन वाढत असून उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
खारघर-सोमवार, तळोजा-शुक्रवार, कळंबोली व नावडे-बुधवार, कामोठे-शुक्रवार, नवीन पनवेल (पूर्व)-सोमवार,नवीन पनवेल (पश्चिम)-मंगळवार, करंजाडे-गुरुवार, काळुंदे-शुक्रवार, उलवे (सेक्टर-2, 3, 5, 6, 19, 299, 20, 29,23, गव्हाण गाव व मोरावे गाव)-मंगळवार, उलवे (सेक्टर-8, 0ए, 9, 10वी, 16, 16ए, 15, 17, 18, 24, कोपर, शिवाजी नगर, न्हावा, शेवा व बामणडोगरी)-शुक्रवार, उलवे (सेक्टर-25 व 25ए) द्रोणागिरी- रविवार या वेळापत्रकानुसार संबंधित नोड विभागामध्ये पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर काही कालावधीत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी वापरताना आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिडको प्रशासनाकडून सर्व जलस्रोतांतील उपलब्ध साठा, दैनंदिन पाणीपुरवठा आणि स्थानिक वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यात येत असून भविष्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे. हेटवणे, मोरबे आणि इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊन जलसाठ्यात वाढ होईपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनीदेखील त्यांच्या कार्यक्षेत्रात पाणी कपातीचे निर्णय घेतले आहेत.
सिडको पाणीपुरवठा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. वाहन धुणणे, पिण्यायोगय पाण्याचा अनावश्यक वापर, पाण्याची गळती दुर्लक्षित ठेवणे, साठवण टाक्या ओव्हरफ्लो होणे अशा बाबी टाळाव्यात.जलसंपत्तीचा जबाबदारीने वापर करून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक काळ सुरुळीत ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सिडको प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Water Scarcity: सिडकोकडून पाणी कपात
