खारफुटी नष्ट होण्याच्यामार्गावर, पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न
| उरण । वार्ताहर ।
विकासाच्या नावाने उरणमधील खारफुटी व पाणथळी या मातीचा भराव करून झपाट्याने बुजवल्या जात असून यामुळे उरणला पुराचा धोका निर्माण झाला आहे, भूजल पातळीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे असं मत नॅटकनेक्ट फाउंडेशन या पर्यावरणवादी संस्थेने व्यक्त केलं आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून त्यांनी या समस्येची दखल घेतल्याचा दावा संस्थेने केला आहे.
राज्य शासनाने नुकतीच नवी मुंबई सेझला एकात्मिक औद्योगिक प्राधिकरण यामध्ये बदल करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे या भूखंडाचा 85 टक्के व्यावसायिक आणि 15 टक्के रहिवासी उद्देशासाठी वापर केला जाणार आहे. सिडकोने मोठ्या प्रमाणात खारफुटी प्रभाग आणि पाणथळ क्षेत्रांना नवी मुंबई सेझला वितरण केल्याबद्दल नॅटकनेक्ट फाउंडेशनने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.
उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी अंमलबजावणी न केल्यामुळे खारफुटी व पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न हे विफल ठरले आहेत. यामुळे आगामी प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा -हास होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. खारफुटी व पाणथळ जागांवर अमानुष पध्दतीने घातला जाणारा भराव यामुळे आता परिसरातील गावांमध्ये आणि भातशेतीमध्ये पावसाळ्यात पुर येत आहे असे सागरशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे संचालक नंदकुमार पवार यांनी सांगितले.
आमचा विकासाला विरोध नाही, खारफुटी व पाणथळ जमीनींवर तयार केलेल्या रस्त्यांवर भेगांच्या मार्फत निसर्गाने आधीच निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे उरणमधील अनेक गावे देखील पुराच्या अंमलाखाली आली आहेत. या परिसरात पाणी शोषून घेण्यासाठी एक इंचभर देखील जमीन शिल्लक राहणार नसल्याने उरण क्षेत्राला पुराचा तडाखा बसेल असा इशारा त्यांनी दिला आहे. –
बी. एन. कुमार संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन