‘या’ तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ

307 गावे, वाड्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

जिल्ह्यातील अलिबागसह 10 तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. गावे, वाड्यांसह 307 ठिकाणी 43 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तरीदेखील पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटन व औद्योगिकीकरण वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. औद्योगिकीकरणाबरोबरच नागरिकीकरणामुळे पाण्याची मागणीदेखील प्रचंड वाढली आहे.

वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी सतत वाढत असल्याने गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचा पुरवठा मर्यादित राहतो. त्यामुळे उपलब्ध जलस्रोत लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत, अशी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर, महाड, माणगांव, पनवेल, उरण, पोलादपूर, श्रीवर्धन या दहा तालुक्यांमधील 56 गावे, 241 वाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्या अभावी महिला वर्ग त्रस्त झाल्या आहेत. उन्हाळी सुट्टीमध्ये मुंबईतून गावी आलेल्या नागरिकांमध्येदेखील नाराजी निर्माण झाली आहे. पाणी टंचाईवर ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरल्याने पाणी टंचाईवर टँकरची मात्रा देण्यास सुरुवात केली आङे. जिल्ह्यातील 307 ठिकाणी 43 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना पाणी पुरवठ्यावर राबवून करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु नागरिकांची पाण्याची तहान भागविण्यास प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Exit mobile version