पाच हजार नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी वणवण
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. रोहा तालुक्यातील वेलशेत व आंबेघर गावातील पाच हजार नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एमआयडीसीमार्फत मिळणार्या पाण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस वाट पाहावी लागत आहे.
रोहा तालुक्यातील वेलशेत व आंबेघर या गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. नागोठणे येथे उभारण्यात आलेल्या रिलायन्स प्रकल्पाला हा पाणीपुरवठा होतो. त्यानंतर कंपनीकडून वेलशेत येथील गावातील मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याचे वितरण केले जाते. तेथून वेलशेत व आंबेघर या दोन गावांना पुरवठा होतो. या गावांचा विस्तार दिवसेंदिवस होत असताना नोकरी व्यवसायानिमित्त कंपनीत येणारे अनेकजण या गावांमध्ये राहात आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा-पंधरा दिवस पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. त्यात काही नागरिकांना पाणी विकत आणावे लागत आहे.
वेलशेत व आंबेघरमधील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाकडून एक कोटीहून अधिक रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली. पाण्याची टाकीसह पाईपदेखील जोडण्यात आले आहे. मात्र, अजूनही या गावांना योजनेतून पाण्याचा थेंबही उपलब्ध झाला नाही. ज्या कंपनीच्या भरोवशावर पाणी मिळण्याची आशा आहे, त्याकडूनही पाणी मिळत नसल्याचा आरोप गंगाराम मिनमीने यांनी केला आहे. कवडीमोल भावाने प्रकल्पासाठी जमिनी देऊनही आंबेघर, वेलशेत गाव पाण्यापासून वंचित असल्याचे मिनमिने यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीने गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीनेदेखील केल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता, एमआयसीडीकडून कंपनीला आणि कंपनीकडून गावांना पाणीपुरवठा केला जातो. फक्त पाच वर्षांसाठीच पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय होता. तरीदेखील गावासाठी पाणी दिले जात आहे. पाणीपुरवठा व्यवस्थित होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.