माथेरानमध्ये रस्त्यावरुन वाहतेय पाणी

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील विकासकामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याची कामे सुरू आहेत. परंतु कामात पूर्णपणे नियोजनशून्यता दिसत असून पहिल्याच पावसात वाहणारे पाणी गटारातून जाण्याऐवजी रस्त्यावरून एखाद्या नदीप्रमाणे वाहत आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्यांनी कशापद्धतीने आपल्या कामाला न्याय दिला आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. माथेरानसारख्या दुर्गम भागासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 123 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. त्याचा सदुपयोग झालेला दिसत नसून अशाप्रकारे कामे केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिलेला निधी गंगाजळीत गेल्यासारखे आहे. सदरची कामे ही वारंवार होणारी नसून शासनसुध्दा या स्थळासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही. परंतु संबंधीत ठेकेदाराने खूपच घाईगडबडीत कामे उरकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या कामांत पारदर्शकता दिसून येत नाही. हे सर्व रस्ते नगरपरिषदेच्या अखत्यारीत येत असताना निदान नगरपरिषदेच्या अभियंत्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. परंतु काय कारणास्तव या महत्वपूर्ण कामांकडे दुर्लक्ष केले गेले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. ज्या-ज्या ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. त्याठिकाणी या कच्च्या स्वरूपाच्या ब्लॉक वर ग्रीट अंथरली होती. त्यामुळे ह्या निकृष्ट दर्जाच्या ब्लॉकसना लपविण्यासाठी ठेकेदाराकडून पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे.

जवळपास 40 कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने रस्ता बनविला. मात्र अयोग्य नियोजनामुळे या रस्त्यावरुन 200 ते 400 मीटरपर्यंत पाणी वाहत आहे. परिसरातील दस्तुरीजवळील काळोखी भागातील दृष्य तर एखादया तरण तलावाप्रमाणे दिसत आहे. करोडो रुपये खर्च करून यासाठी कन्सल्टंट इंजिनीअर नेमताना केवळ या कामातील मिळणारी टक्केवारी याकडे लक्ष दिले गेल्यामुळे या महत्वपूर्ण कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराने तर सगळीकडे धरठोक कामे केल्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात गेला आहे.

शिवाजी शिंदे
माजी नगरसेवक माथेरान


Exit mobile version