। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरात महसुल विभागाचे मुख्यालय तयार झाले असून प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारासमोरच चक्क पावसाच्या पाण्यामुळे तळे तयार झाले आहे. नुकतेच या प्रशासकीय भवनातून शासकीय कामकाजाला सुरुवात झाली आहे. तर या प्रशासकीय भवनाच्या उभारणीसाठी तब्बल 15 कोटींचा खर्च करण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या भवनांचे लोकार्पण करण्यात आले होते. सध्या दहावी आणि बारावीच्या मुलांचे निकाल लागले असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक शासकीय दाखले मिळविण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात गर्दी करून आहेत. त्यामुळे नवीन प्रशासकीय भवनातील लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच प्रवेशद्वारावर पावसाच्या पाण्याचे तळे निर्माण झाल्याने प्रशासकीय भवनात शासकीय कामासाठी येणारे नागरिक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यी यांना या चिखातून प्रशासकीय भवनात प्रवेश करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांना माहिती दिली असून तहसीलदार यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविण्याची सूचना दिल्या आहेत.