लोकप्रतिनिधींची उदासिनता सर्वस्वी जबाबदार
। पेण । प्रतिनिधी ।
गेल्या चार निवडणूका पेण खारेपाटातील पाण्याच्या प्रश्नावर लढल्या गेल्या आहेत. 2024 ची निवडणूक सुद्धा याच मुद्यावर गाजणार यात काही शंका नाही. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणार्या हेटवणा धरण हाकेच्या अंतरावर असून देखील खारेपाटात जानेवारी नंतर पाणी टंचाईला सुरूवात होते. या विभागात शेकापक्षा मार्फत वेगवेगळ्या दोन योजना राबविल्या आहेत. या दोन्ही योजना यशस्वी झाल्यात, परंतु पुर्णतः पाणी प्रश्न सोडविण्यास यश आले नाही.
आजच्या घडीला या विभागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप कागदावर असलेल्या योजनेचा श्रेय घेऊ पाहत आहेत. परंतु, कागदावर असलेली योजना अंमलात येण्यासाठी पुढची विधानसभेची निवडणूक येणार नाही, अशी खात्री विद्यमान खासदार तटकरे किंवा आमदार रवि पाटील हे दोघेही देत नाहीत. खारेपाटात योग्यप्रकारे पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक वेळेला खारेपाट साथीच्या आजाराच्या विळख्यात सापडतो. याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधींची खारेपाटा प्रती असलेली उदासिनताच आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे खारेपाटातील मतदार हा सुज्ञ व उच्च शिक्षित आहे. पेण विधानसभा मतदार संघाचा विचार करता समाज माध्यमांवर सर्वात जास्त सक्रिय खारेपाट विभाग आहे. यामुळे राजकीय मंडळीला या विभागात मतदार डोईजड जातात. कारण या मतदारांना लक्ष्मी दर्शन भुरळ घालू शकत नाहीत. त्यांना विकासकामांची गरज आहे. आज खारेपाट विभागात पाणी समस्या असल्याने कित्येक जणांनी स्वतःला स्थलांतरीत करून परवडत नसताना देखील शहराच्या आजुबाजुला राहणे पसंत केले आहे. खारेपाटातील पाणी प्रश्न हा नियोजनाच्या आभावामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या नाकरतेपणामुळे शिल्लक असल्याचे मत मतदारांचे आहे. यामुळे या निवडणूकीत देखील पाणी प्रश्न हा प्रस्तापितांना महागात पडण्याची शक्यता नाकरता येणार नाही.