काळुंद्रे नदीचे नांदगाव पुलावर पाणी

गावाचा संपर्क तुटला

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

शनिवारी (दि. 20) सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहे. जुन्या मुंबई-पनवेल महामार्गावरून नांदगाव गावात जाणार्‍या पुलावरूनही काळुंद्रे नदीचे पाणी गेल्याने या पुलावरून गावात जाणारी वाहतूक काही काळ खंडित झाली होती. तसेच गावाचा संपर्कदेखील तुटला आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ओएनजीसी कंपनीजवळ कोकण रेल्वेच्या पुलाखाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. पुणे आणि मुंबईच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे दोन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तासभर किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ वाहनचालक, प्रवासी ताटकळत असतात. यामुळे अनेकदा वाहनचालक नांदगावमार्गे पळस्पेला जाणार्‍या रस्त्याचा वापर करत असतात. पनवेलवरून भिंगारी गावाजवळ उजवीकडे वळून नांदगावला जाण्याचा रस्ता आहे. येथे नदी ओलांडण्यासाठी जिल्हा परिषदेने बांधलेला कलव्हर्ट प्रकारचा अतिशय कमी उंचाची पूल आहे. एरवी फक्त नांदगावातील नागरिकांसाठी वापरला जाणारा हा रस्ता महामार्गावरील कोंडीमुळे वापरात आला आहे. काळुंद्रे नदीवरील या पुलावरून पाणी गेल्याने या ठिकाणची वाहतूक खंडित होऊन वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

कोळवडी गावातदेखील पाणी
तालुक्यातील कोलवडी गावातदेखील पावसामुळे पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले. पावसाळी नाल्यातील पाणी गावातील रस्त्यावर आल्याने गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
वावंजे गावातील रस्त्यावर पाणी
तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील वावंजे गावाला जोडणार्‍या मार्गांवरदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
Exit mobile version