उरण पूर्व विभागात पाणी समस्या

जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने नाराजी

उरण | वार्ताहर |

पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या आठ गाव पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे उरण पुर्व विभागातील पिरकोण,सारडे, वशेणी, पुनाडे,पाले, गोवठणे, आवरे गावांना पाणी समस्येची झळ ही सोसावी लागत आहे.ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने या गावातील रहिवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत. गावातील सुमारे 25 हजार रहिवाशांना आठ गाव पाणी पुरवठा योजने अंतर्गत तालुक्यातील पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतू सारडे ग्रामपंचायत हद्दीतून जाणारी जलवाहिनी ही वारंवार फुटत असल्याने रहिवाशांना करण्यात येत असलेला पाणी पुरवठा हा खंडित होत आहे.
शनिवारी ( दि.5) पुन्हा एकदा सारडे ग्रामपंचायत हद्दीत जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या गावातील रहिवाशांना करण्यात येत असलेला पाणी पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांना भरपावसात पाणी टंचाईचा सामना हा तीन दिवस सहन करावा लागेल असे ग्रास्थांचे म्हणणे आहे.

धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नेहमी फुटते कशी असा रहिवाशांचा सवाल आहे. गावकरी नियमित पाणी पट्टी भरतात, मग रहिवाशांना वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पाणी पुरवठा कमिटीने, संबंधित प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
– सुगंधा पाटील

 पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत असलेली जलवाहिनी फुटल्याची घटना नूकताच घडली होती. सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम आठ गाव पाणी पुरवठा कमिटीने हाती घेतले आहे. त्यामुळे लवकरच लवकर पाणी पुरवठा सुरळीत होईल.  
–  मुकुंद गावंड

Exit mobile version