बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत मूलभूत समस्यांची वानवा
उरण | वार्ताहर |
उरण तालुका हा मावळ लोकसभा मतदारसंघात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेतले होते. गावांना मूलभूत सुविधा पुरवून गावे, खेडी स्वयंपूर्ण बनविणे हा त्या दत्तक घेण्यापाठीमगचा उद्देश होता. या उद्देशाला अनुसरून खासदार श्रीरंग बारणे यांनी तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत दत्तक घेतले. गाव दत्तक घेऊनही गावात मूलभूत सुविधांची वानवा असल्याबाबतची बाब आता पाणीसमस्येच्या माध्यमातून पुढे आली आहे.
उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीत काही महिन्यांपासून पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. नळाला पाणी एक दिवस आड येत आहे आणि पाणी आले तरी मध्येच बंद पडत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप मोठे हाल होत आहेत. खोपटे (बांधपाडा )ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करणे व पाणीप्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी सरपंच विशाखा ठाकूर, ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.