पाण्याचे पंप बद, जनता तहानलेली

पर्यटन व्यवसायावर होतोय विपरीत परिणाम
| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा असून देखील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे पाण्याचे पंप बंद आहेत. त्यामुळे माथेरानकरांना गेल्या दोन दिवसांपासून पाणी उपलब्ध नसल्याने ते तहानलेले आहेत. शिवाय येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम झाल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात माथेरानकरांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत माथेरानमध्ये पाण्याची समस्या कायम होती.

माथेरानला महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत शारलोट तलाव व नेरळ कुंभे येथील जल केंद्रातून पाणी पुरवठा होतो. शारलोट तलावातील पाणी हे पंपाद्वारे फिल्टर हाऊस येथे पोहोचविले जाते. नेरळ कुंभे येथून जुमापट्टी, वॉटरपाईप या जल केंद्रातून फिल्टर हाऊसपर्यंत पाणी पंपाद्वारे पाठविले जाते. त्यामुळे माथेरानला मुबलक पाणी पुरवठा होतो. पण मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडून माथेरानल् पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. शारलोट तलावातील पंप हाऊसमधील पंप नादुरुस्त असल्याचे व नेरळ येथे शेतात पाईपलाईन फुटल्याचे कारण पुढे केले आहे.

शनिवार आणि रविवार वीकेंड असल्याने पर्यटकसुद्धा माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात आले आहेत, असे असताना येथील छोटे हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवावे लागल्याचे चित्र आहे. माथेरानमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाणी महाग दिले जाते. सर्वसामान्यांकडून बीलांची वसुली तात्काळ केली जाते. यासाठी अधिकारी माथेरानमध्ये तळ ठोकून राहतात, पण पाणी दोन दिवस दिले नाही, तर एकही अधिकारी माथेरानमध्ये फिरकला नाही. ठेकेदारामार्फत नियुक्त केलेले कर्मचारीच केवळ येथे दिसून येतात.

अतिरिक्त पंप सुद्धा निकामी
शारलोट तलावात पाणी पंपिंग करण्यासाठी दोन पंप बसविले आहेत. एक 75 हॉर्स पॉवरचा समर्सिबल, तर 100 हॉर्स पॉवरचा सेन्ट्रीफ्युगल पंप बसविण्यात आले आहेत. पण कित्येक वर्षे त्यांची डागडुजी न केल्यामुळे एक पंप बंद पडला आहे. अतिरिक्त असलेल्या पंपामार्फत जेव्हा पाणी दिले जात होते तेव्हा बंद असलेला पंप दुरुस्त करणे गरजेचे होते. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. शेवटी दुसरा पंपही बंद झाल्यामुळे अशी परिस्थिती ओढावली आहे.

गुरुवार 26 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 नंतर पाणी बंद झाले. आज 28 ऑक्टोबरला सुद्धा पाणी आले नाही. अधिकारी दोन दिवसांपासून लापता आहेत. पूर्वी तक्रारवही असल्याची पण आता ती सुद्धा नाही. त्यामुळे तक्रार करायची तयारी कुठे. या विरोधात पूर्ण माथेरान एकवटून महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणू.
-प्रकाश सुतार,माजी नगरसेवक

नेरळमधील शेतात पाईपलाईन मोठ्या प्रमाणात फुटली होती. तसेच शारलोट तलावातील दोन पंप नादुरुस्त होते. पंप दुरुस्तीसाठी कामगार पाठवले आहेत. ते काम करत आहेत. नेरळमधील फुटलेली पाईपलाईन दुरुस्त केली आहे. आता पाणी सोडण्यात येईल. लवकरच माथेरानकरांना पाणी उपलब्ध होईल.
-भरत पवार,उपविभागीय अभियंता,पनवेल

Exit mobile version