कोंढाणेतील पाणीसाठा राखून ठेवावा; कर्जतकरांची शासनाकडे मागणी

। नेरळ । संतोष पेरणे ।
कर्जत तालुक्याचे शेवटच्या टोकावर आणि पुणे जिल्हा हद्दीला लागून असलेल्या कोंढाणे येथे उल्हास नदीवर मोठे धरण बांधण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. मात्र, हे धरण शासनाने नवी मुंबईमधील नैना गृह प्रकल्पसाठी सिडकोला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तालुक्याच्या जवळ असलेले मोरबे धरण नवी मुंबई महानगर पालिकेला विकल्यानंतर तेथे असलेल्या नदीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका एक थेंबदेखील पाणी सोडत नाही. दरम्यान, भविष्यातील ही संभाव्य भीती लक्षात घेऊन कोंढाणे धरण शासनाने सिडकोला विकू नये आणि विकले असल्यास त्यातील पाणीसाठा कर्जत तालुक्यासाठी राखून ठेवावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
धरण व्हावे यासाठी कोंढाणे धरणापासून मंत्रालयापर्यंत कर्जत तालुक्यातील शेकडो जनतेने एकत्र येत फेब्रुवारी 2013 मध्ये लाँग मार्च काढला होता. धरणाची मागणी करणारे असंख्य नागरिक त्या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते.लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्व शेतकरी यांची मागणी धरण व्हावे आणि आपला परिसर पाणी आल्याने स्वयंपूर्ण व्हावा असे वाटत होते. मात्र, राज्य सरकार सिंचन घोटाळा नक्की कोणता झाला होता? हे कोंढाणे धरणाबाबत सांगू शकले नाही. मग एवढी वर्षे राज्य सरकारने धरणाचे काम का रखडवून ठेवले, असा आपला प्रश्‍न आहे.

दोन गावांचे पुनर्वसन आवशयक
उल्हास नदीच्या पाण्यावर बांधण्यात येणार्‍या या धरणासाठी एकूण 425 हेक्टर जमीन लागणार असून, यात 122 हेक्टर जमीन ही खासगी जमीन आहे. या धरण प्रकल्पात कोंढाणे आणि चोची ही दोन गावे विस्थापित होणार असून, 118 कुटुंबांचे धरणापासून आठ किलोमीटर लांब असलेल्या शासकीय जमिनीत पुनर्वसन होणार आहे. या प्रकल्पासंर्दभात एका जनहित याचिकेसह पाच याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या याचिकांची विचार न करता शासनाने स्थानिकांची विरोध डावलून कोंढाणे धरण कोणत्या आधारे सिडको महामंडळास विकले, हे जाहीर करायला हवे.

सिडकोकडील कोंढाणे धारणाबाबत माहिती
दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने अडगळीत टाकण्यात आलेले हे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा, म्हणून शासनाने 270 गावांलगतचे 474 किलोमीटर क्षेत्र हे नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात विमानतळ, एसईझेड, कॉर्पोरेट या व्यावसायिक उपक्रमांबरोबर नैना नागरी क्षेत्र विकसित होणार आहे. या सर्व क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी लागणार असल्याने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नैना क्षेत्रापासून 30 ते 35 किलोमीटर लांब आणि कर्जत शहरापासून 13 किलोमीटर दूर असलेल्या कोंढाणे धरणाचा पर्याय निवडण्यात आला आहे.

कर्जतला पाण्याची गरज
कर्जत तालुक्याचे वाढते नागरीकरण लक्षात घेता आमच्या भागाला खर्‍या अर्थाने पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यावेळी कर्जत तालुक्याची तहान कायमस्वरुपी भागविण्यासाठी कोंढाणे धरण आमच्या तालुक्यासाठी राखीव ठेवले जाणे आवश्यक आहे. सिडकोसारख्या लाखो लोकांची वस्ती असलेल्या भागाला कोंढाणेमधून मिळणारे पाणी हे शहराला लागणार्‍या पाण्याच्या काही टक्के एवढे आहे. त्यामुळे या अपुर्‍या पाण्यासाठी शासनाने सिडकोला विकलेले धरण रद्द करून कर्जत तालुक्यासाठी हे धरण आरक्षित करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे हे धरण दोन वर्षांनंतर आता पुन्हा चर्चेत आले आहे.

Exit mobile version