| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्याचे औद्योगिकीकरणाबरोबर नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उरणकरांची पाण्याची तहान भागविणारे रानसई धरण अपुरे पडू लागले आहे. अनेक भागात पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. रानसई धरणाची आत्ताची पाण्याची पातळी ही 103 फुटापर्यंत खाली आली आहे. धरणात 10 मेंपर्यंत पुरेल एवढाच जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने उरणकरांवर येत्या काही दिवसात पाणी संकट ओढवणार आहे.
उरण तालुका मुंबई, नवी मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर वसलेला आहे. तालुक्यात एन. ए. डी, ओएनजीसी, जेएनपीटी बंदर, बिपिसिएल, जिटीपीएस आदी केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. शिवाय काही नवीन उदयास येत आहेत. द्रोणागिरी नोडचादेखील मागील काही वर्षांपासून विकास झाला आहे. त्यातच उरण रेल्वे सेवा सुरू झाल्याने येत्या काही दिवसात नागरीकरण देखील झपाट्याने वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उरण तालुक्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व शिवडी-न्हावा सेतू (सिलींग) उदयास येत असल्याने या परिसराचा विकास साधण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता, येत्या काही वर्षांत उरणमधील लोकसंख्या ही तिपटीने वाढणार आहे. सद्यास्तितीत येथील प्रकल्पांना, 21 ग्रामपंचायत आणि नगरपालिकेला उरण तालुक्यातील रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र तरीही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याची ओरड करण्यात येत आहे. त्यातच आता रानसई धरणामध्ये पाणीसाठा कमी होत चालला आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ही 103 फुटापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या माध्यमातून दोन दिवस पाणी कपात केली जात आहे. येत्या 10 मेपर्यंत पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला असल्याने भविष्यात पाणीसंकट ओढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.