ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

| चणेरा | सत्यप्रसाद आढाव |

रोहा तालुक्यातील दुर्गम भाग असलेला चिंचोली तर्फे आतोने या ग्रामपंचायतीच्या हद्दीत खरबाची वाडी व इतर चार आदिवासी वाड्या आहेत. येथे जवळपास 300 ते 400 कुटुंबं राहतात. तेथील लोकसंख्या 1000 ते 1100 आहे. मात्र, अद्याप या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे . देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे पूर्ण झालेत परंतु आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार असा प्रश्‍न येथील महिलांनी उपस्थित केला आहे. रोजच्या रोज पायपीट करून विहिरीवरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी भल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. वाडीत योजना राबविण्यात आली आहे या योजनेत करोडो रुपये खर्च करूनसुद्धा पाणी घरापर्यंत न मिळाल्यामुळे महिलांनी संताप देखील व्यक्त केलेला आहे.

पाणी म्हणजेच जीवन आहे. याचाच प्रत्येय खरबाची वाडी येथे गेल्याशिवाय कळत नाही. हंडाभर पाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटर खोल दरीमध्ये उतरून मरणयातनेचे दुर्भाग्य खरबाची वाडी येथील आदिवासी महिलांच्या नशिबी आलेले आहे. येथील महिलांना सकाळपासूनच पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागत आहे. हंडाभर पाण्याचे काय मोल असते, हे त्यांच्या तोंडूनच ऐकायला मिळतं. डोळ्यात तेल घालून खोल दरीत पाण्यासाठी त्यांना उतरावे लागतं. त्यात पावसाळा असल्यामुळे येथे रस्तासुद्धा नसल्याने अनेक महिला जायबंदी झालेल्या आहेत. पाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत या महिलांना करावी लागते, त्यामुळे पाण्याच्या एका हंड्यासाठी घरच्या लक्ष्मीला, लेकराला रानावन फिरताना घरचा मालक हतबल झालेला आहे.

ग्रामपंचायत चिंचोली तर्फे आंतोणे, ता. रोहा येथे हर घर जल योजनेचे काम डी.के. कन्स्ट्रक्शन (प्रोप्रा. दिनेश मनोहर खैरे) या ठेकेदाराला दिले असून, दि. 31 डिसेंबर 2022 रोजी काम सुरू केले असून, योजना पूर्ण होण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2023 होती. मात्र, 2 कोटी 15 लाख 58 हजार 578 इतके रुपये खर्च करूनसुद्धा अद्याप या वाडीसह कोणत्याच गावाला पाणी मिळाले नाही. रोहा पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता युवराज गांगुर्डे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, या योजनेसंदर्भात येता एक-दोन दिवसात माहिती देऊ.

अन्यथा हंडा मोर्चा काढू
हर घर जल या योजनेंतर्गत गेली दोन वर्षे काम चालू आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाण्यासंदर्भात सात ते आठ वेळा ग्रामस्थांनी अर्ज केलेले आहेत. खरबाचीवाडी व इतर चार वाड्या मिळून हजारच्या वर लोकसंख्या येथे आहे. नुसते कामाचे ठेकेदाराकडून फलक लावले जातात, प्रत्यक्षात मात्र पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्हा सर्व भगिनींच्या डोक्यावरचा हंडा पाणीपुरवठा विभागाने उतरवून सर्वांना घरापर्यंत पाणी मिळालं पाहिजे, नाहीतर काही दिवसांत रोहा पंचायत समिती व ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर आम्ही सर्व आदिवासी महिला हंडा मोर्चा काढू, असा इशारा जीवनधारा संस्थेच्या पदाधिकारी सुषमा विनय पवार यांनी दिला आहे.
Exit mobile version