। उरण । वार्ताहर ।
चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील करंजा गावात पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासत आहे. गावात 15 ते 16 दिवसांत एकदा पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पाण्याची सोय झाली नाहीतर जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून दिवाळी सुरु झाली आहे. परंतु करंजा गावातील जनताही दिवाळीपेक्षा आजच्या दिवशीची आतुरतेने वाट बघत होते, त्याला कारण ही तसेच म्हणजे 16 दिवसांनी करंजा गावात पाणी येणार आहे. त्यामुळे आज करंजा कोंढरी गावाची खरी दिवाळी साजरी होणार असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संबंधित ग्रामपंचायत सदस्यांची संतप्त ग्रामस्थांकडून जाब विचारला जात आहे. यावर ग्रामपंचायत सदस्य हताश झाले आहेत. व्हॉट्सएप ग्रुपवर पाणी समस्यांवरून आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. त्यामुळे करंजा गावातील पाण्याची समस्या मार्गी लागली नाहीतर ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.