| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ गावाजवळ असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतमधील ममदापुरवाडी पिण्याचे पाण्यासाठी तहानलेली आहे. ममदापूर नळपाणी योजनेतून दिले जाणारे पाणी वाडीपर्यंत नेण्यासाठी टाकण्यात आलेली जलवाहिनी जमिनीत आहे. पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीमध्ये अद्याप पाण्याचा थेंब पोहचला नाही. त्यामुळे नळपाणी योजनेचे पाणी वाडीमध्ये येत नसल्याने ग्रामस्थांना डवरे खोदून पाणी प्यावे लागत आहे. तर तेथील जुनी विहीर कोसळली असून आदिवासी ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे.
ममदापूर आदिवासीवाडीमध्ये 35 कुटुंबे राहत असून त्यांना आतापर्यंत दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्या ठिकाणी मागे असलेल्या डोंगरातील पाणी पिण्यासाठी आदिवासी ग्रामस्थ वापरत असून त्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कपारीत ग्रामस्थांनी डवरे खोदले आहेत. आदिवासींवाडीसाठी असलेली विहीर नादुरुस्त असल्याने पाणी जास्त साठून राहत नाही. त्यामुळे त्या वाडीत कायम पाण्याची टंचाई असते. अशावेळी स्थानिक ग्रामस्थ हे आजूबाजूला असलेल्या फार्म हाऊसमधील बोअरवेलचे पाणी आणून तहान भागवतात.
पाण्याचे दुसरे स्रोत नसल्याने नाईलाजस्तव हे दूषित पाणी ग्रामस्थ वापरतो. या पाण्याचा पुरवठा जेमतेम जानेवारी पर्यंतच होतो. त्यानंतर हे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री विहिरीजवळ रात्र जागून काढावी लागते. ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पेयजल योजना मंजुर झाली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून या योजनेचा लाभ अदिवासी ममदापुर वाडीला झालेला नाही. त्यामुळे मुलभूत गरज असलेल्या पाण्याच्या समस्येमूळे ग्रामस्थांमध्ये जनाक्रोश निर्माण झालेला आहे. परिणामी ग्रामस्थ अंदोलनाच्या पवित्र्यात असून तेथील महिला आणि शाळेत जाणार्या मुली यांचा वेळ पाणी भरण्यासाठी होत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.