| नेरळ | वार्ताहर |
ऐन पावसाळ्यात नेरळ टेपआळी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने येथील महिलांनी शक्रवारी सकाळी नेरळ ग्रामपंचायतीला धडक दिली. परंतु, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामसेवक नसल्याने आपला रोष या महिलांनी कात्रीत सापडलेल्या सदस्यांवर काढला. मात्र, यावेळी सदस्यांनी ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण करून देऊ या आश्वासनावर आक्रमक झालेल्या महिला शांत झाल्या.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत ही नेहमी वादात राहिली आहे. येथे सत्ताधारी यांचे नियोजन फसल्यानेच सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.नेरळ ग्रामपंचायत परिसरात ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पाणी मिळते, तर ते अशुद्ध मिळत आहे, त्यामुळे अशा पाण्याने काही ग्रामस्थ आजारी पडलेत. त्यातच कायम शांत असलेला नेरळ ग्रामपंचायतमधील टेपआळी वॉर्ड हा यावेळी ग्रामपंचायत विरोधात आक्रमक झालेला पाहिला मिळाला.
एकूणच नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक वॉर्डमधील ग्रामस्थाना पाणीटंचाई ही मुख्य समस्या भेडसावत आहे, तर घाणीचे साम्राज्यदेखील त्यांना नकोसे करीत आहेत. कर्मचारी कमी पडतात अशी बोंब आरोग्य खात्याच्या कर्मचारी यांची आहे; परंतु नेरळ ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी यांचे नियोजन फसल्यानेच आज सामान्य नागरिकांना विविध समस्याला सामोरे जावे लागत आहे.