पावसाळा सरताच ग्रामीण भागात पाणीकपात

दोन दिवसाआड पाणीपुरवठा; उन्हाळ्यातील नियोजनासाठी पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील ग्रामीण भागाला दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार असून, अगदी ऑक्टोबर महिन्यापासूनच चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. येत्या आठवड्यापासून पेणच्या ग्रामीण भागात शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने संबंधित ग्रामपंचायतींना देऊन सूचित केले आहे.

पाणीटंचाई ही पेण तालुक्यातील खारेपाट भागाची गेली अनेक दशकांपासूनची फार मोठी समस्या आहे. अनेक निवडणुका झाल्या. सत्तांतर झाले, येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची आश्‍वासने झेलली. मात्र, दरवर्षी फक्त आश्‍वासनांचे गाजर या ग्रामस्थांच्या वाट्याला आलेले पहायला मिळत आहे. पावसाने विश्रांती घेऊन आठ ते दहा दिवस होत नाहीत तोच आता या भागातील नागरिकांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मोठा धक्का दिला आहे. आजपासून म्हणजेच सोमवार (दि.31) पेणमधील ग्रामीण भागाला दोन दिवसआड पाणी पुरवठा केला जाणार आसल्याचे पत्र प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले आहेत.

पावसाळा सरत नाही तोच पाणीटंचाईची चाहूल या ग्रामस्थांना सोसावी लागणार आहे. विशेष म्हणजे, हा पाणीपुरवठा रात्री-अपरात्रीसुद्धा होणार असल्याने सध्या पेणच्या ग्रामीण भागात भातकापणी व भात झोडणीची जोरदार कामे सुरू आहेत. दिवसभर शेतात काम करून थकून आलेल्या मायमावळ्या रात्री निवांत झोपदेखील घेऊ शकणार नाही. त्यामुळे हा पाणी पुरवठा रात्री-अपरात्री करू नये, ग्रामस्थांवर अशा प्रकारचा होणारा अन्याय थांबवावा तसेच जर दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार असेल, तर आमच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना जी पाणीपट्टी येते, त्याचादेखील विचार शासनाने करावा. आज औद्योगिकीकरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी फिरवले जात आहे. परंतु, सर्वसामान्य माणसांना जीवनावश्यक जिन्नस म्हणून पाण्याची आवश्यकता असताना ती वेळेवर देता येत नाही, हीच शोकांतिका आहे.

शहापाडा धरणात असलेल्या पाण्याचे नियोजन आत्तापासून केले नाही तर उन्हाळ्यात खारेपाटात बिकट अवस्था येईल. सर्वसामान्य नागरिकांना रोजचे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे; परंतु पाण्याची असणारी कमतरता पाहता नियोजन करणे हे गरजेचे आहे.

आर.एम. राठोड
अभियंता, पाणीपुरवठा विभाग

माजी आ. धैर्यशील पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून हेटवणे शहापाडा पाणी योजनेसाठी 30 कोटींचा निधी आणला; परंतु ठेकेदार आणि अकार्यक्षम स्थानिक आमदारांच्यामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आज खारेपाटातील जनतेवर ही परिस्थिती आलेली आहे. दोन दिवसाआड पाणी देऊन शासन पूर्णपणे खारेपाटातील जनतेच्या भावनांशी खेळत आहे. आज खारेपाटात मोठ्या प्रमाणात कापणी, बांधणीची कामे सुरू आहेत. परंतु, जर एक दिवसाआड पाणी आल्यास शेतावर काम करायचे की पाणी भरायचे. त्यामुळे हेटवणा शहापाडा योजनेचे काम युध्दपातळीवर पूर्ण करून त्वरित ती योजना कार्यान्वित करावी एवढीच अपेक्षा.

विवेक म्हात्रे, सरपंच, दिव
Exit mobile version