ग्रामीण भागातील पाण्यासाठीची वणवण थांबली

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अक हजार 422 पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी 95 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, 74 योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ जोडण्या दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.

जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्वकुटुंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. या योजनेच्या माध्यमातून 15 तालुक्यांमध्ये 1 हजार 422 योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील 95 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

कारवाई सोबत गुणवत्ता पूर्वक काम करण्यास प्राधान्य
जल जीवन मिशन अंतर्गत कार्यारंभ आदेश देऊनही एक वर्षांचा कालावधी उलटूनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 14 ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळया यादीत टाकून, त्यांच्याकडून 26 कामे काढून घेण्यात आली आहेत. या 26 कामांची फेर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना
रायगड जिल्ह्यात 95 पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये अलिबाग 8, कर्जत 4, महाड 4, माणगाव 11, म्हसळा 6, मुरुड 7, पनवेल 1, पेण 9, पोलादपूर 12, रोहा 8, श्रीवर्धन 11, सुधागड 10, तळा 3, उरण 1 योजनांचा समावेश आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत 95 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात 74 योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

आमच्या गावात पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन आमच्या घरात नळ कनेक्शन देण्यात आले आहे. यापूर्वी आम्हाला गावातील विहिरीवरुन तसेच सार्वजनिक नळावरुन पाणी भरावे लागत होते. मात्र आत्ता आमचे हे श्रम वाचले आहेत.

सुहासिनी आठवले

आमच्या घरात नळ कनेक्शन देण्यात आले आहे. दररोज नळाला पाणी येत आहे. यापूर्वी गावातील सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत होते. यामुळे नळावर नंबर लाऊन, नंबर येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. यामुळे खूप वेळ वाया जात होता. मात्र आत्ता घरात नळ असल्याने हा वेळ वाचत आहे.

मंजुळा आंबाडे
Exit mobile version