आराखड्यात 27 गावे, 68 वाड्या टँकरग्रस्त
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात निर्माण होणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाईचा आरखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात 27 गावे आणि 68 आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल असा आरखडा तयार करण्यात आला आहे. गतवर्षीच्या उन्हळ्यात 18 गावे आणि 60 आदिवासी वाड्यांचा समावेश पाणीटंचाई कृती आराखड्यात करण्यात आला होता. त्यावेळी 16 गावे आणि 27 आदिवासी वाड्यायांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, एप्रिल महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागल्याने तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी नागरीकांमधून होऊ लागली आहे.
कर्जत तालुका आदिवासी तालुका असून दुर्गम भागात वसलेल्या या तालुक्यातील उल्हास नदी वगळता अन्य नद्या या उन्हळ्यात कोरड्या राहतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना सुरु झाला कि पाणीटंचाई जाणवत असते.त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आरखडा तयार करण्यात येतो. त्या कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरी खोदणे,विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात. यावर्षी कर्जत तालुक्यात 27 गावे आणि 68 आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून तेथे ट्रँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यावर ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने 47 लाख 50 हजाराचा निधीची तरतूद केली आहे.