वाढते प्रदूषण रोखण्यासाठी खारघर टोल नाक्यावर पाण्याची फवारणी

| पनवेल | प्रतिनिधी |
हवेतील वायु गुणवत्ता निर्देशांक चढा न राहता धुलीकणाची मात्रा कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी पनवेल महापालिकेला दिलेल्या आदेशानंतर पनवेल शीव महामार्गावरील खारघर टोलनाक्यावर पालिकेने वाहनांवर पाण्याचा मारा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली.

पहिल्यांदाच केलेल्या या प्रयोगामध्ये एका तासात साडेतीनशेहून अधिक वाहनांवर पाण्याचा शिडकाव करण्यात आला. हवेतील प्रदूषण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने याबाबतची उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासांत पालिका प्रशासनाने खारघर टोलनाक्यावर पाण्याच्या टाकी व इतर यंत्रणा कार्यान्वित केली.

10 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे बसविण्यात आली असून एकावेळी 12 नोझल टोलनाक्यावर केले आहेत. तसेच एका टाकीतील पाणी 2 तासांत संपल्यानतंर पुन्हा नव्याने टाकी भरली जाते. तासाला 300 ते 350 गाड्यांवर पाणी मारण्यात येते, अशी माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली. स्वतः आयुक्तांनी ही यंत्रणा व्यवस्थित चालविली जाते का, याचा आढावा घेतला. यासाठी लागणारे पाणी सध्या पालिका कोपरा तलावातून आणले जात आहे. 24 तास ही यंत्रणा सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी 12 ते 15 टँकर पाण्याचेे नियोजन पालिकेने केले आहे. हा पाण्याचा मारा पुढील पाच ते सहा दिवस सुरू राहणार आहे.

वाहनांवर पाणी माऱ्याचा प्रयोग पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गावर केला जात आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवरील माती व धूळ कमी होऊन मुंबई शहरातील हवेतील धूलिकण कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Exit mobile version