अनेक गावांमध्ये कपातीचे संकट, पाण्यासाठी आतापासूनच वणवण
| अलिबाग| प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील लघुपाट बंधारे विभागातील धरणांद्वारे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सरासरी 50.52 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक राहिला असून 14 धरणांमध्ये 50 टक्क्यांहून कमी जलसाठा असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट सुरु झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी आतापासूनच वणवण करण्याची वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये फणसाड, तळामध्ये वावा, रोहामध्ये सुतारवाडी, पेणमध्ये आंबेघर, अलिबागमध्ये श्रीगांव, सुधागडमध्ये कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धनमध्ये कार्ले, कुडकी, रानीवली, म्हसळामध्ये पाभरे, संदेरी, महाडमध्ये वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, कर्जतमध्ये खैरे, साळोखे, अवसरे, खालापूरमध्ये भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवत, पनवेलमध्ये मोरबे, बामणोली, उसरण, पुनाडे अशी एकूण 28 धरणे लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित आहेत. सुधागड, महाड, खालापूरमध्ये लहान धरणांची संख्या अधिक आहे.
या धरणांमधून रायगड सह अन्य नवी मुंबई येथील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने धरणे शंभर टक्के पाण्याने भरून गेली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वापरही प्रचंड होऊ लागला आहे. पाण्याच्या वापरामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील कमी होऊ लागली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील 14 धरणांमध्ये 50 टक्केहून कमी जलसाठा असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये फणसाड, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानीवली, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, अवसरे, डोणवत, पुनाडे या धरणांचा समावेश आहे. ढोकशेत धरणामध्ये फक्त 17 टक्के, कवेळे धरणात 26 टक्के, फणसाड धरणात 33 टक्के, कोंडगाव धरणात 35 टक्के, रानीवलीमध्ये 34 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याची टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी पाणी कपात करण्याचे संबंधीत यंत्रणांनी सुरु केले आहे. नागरिकांनीदेखील पाणी जपून वापरण्याची सवय लावून घ्यावी. जेणेकरून पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
पाणी कपातीचे संकट जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी हा जलसाठा नागरिकांना उपलब्ध व्हावा यासाठी लघु पाटबंधारे विभागाने पाणी कपातीला सुरुवात केली आहे. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण होऊ नये यासाठी ठिकाणी दिवसा आड पाणी कपात सुरु केली आहे. या पाणी कपातीचे संकट निर्माण झाल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.