कोल्हारे ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा

पुराचा पाणीपुरवठ्यावर परिणाम

| नेरळ | वार्ताहर |

गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्याची तहान भागवणारी उल्हासनदी दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे तालुक्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याचा परिणाम कोल्हारे ग्रामपंचायतच्या पाणी योजनेवर झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत पाणीबाणी निर्माण झाल्याने कोल्हारे ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून सतत रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात येत आहेत. त्यानुसार तालुक्यात पाऊस संततधार कोसळतच आहे. त्यामुळे तालुक्यातील महत्वाची मानली जाणाऱ्या उल्हास नदीचे पात्र दुथडीभरून वाहत होते. परिणामी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले होते. तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता. यासह या पूरजन्य परिस्थतीचा पाणी योजनांवर परिणाम झाला आहे. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नव्याने सुरु असलेल्या पाणी योजनेवर देखील याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत पाणी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले, उपसरपंच नूतन पेरणे, अस्मिता विरले, साक्षी विरले, गीता मोरे, रोशन म्हसकर यांनी यावर तोडगा काढला आहे. पाणी टंचाई निर्माण झालेल्या भागात ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी टंचाईच्या समस्येवर मत करण्यात आली आहे. तसेच काही भागात पाणी टंचाई असल्यास ग्रामस्थांनी कळवावे तेथे तात्काळ टँकर उपलब्ध करून दिला जाईल असे आवाहन सरपंच विरले यांनी केले आहे.

मुसळधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम पाणी पुरवठा यंत्रणेवर होत आहे. त्यामुळे तात्पुरत्या समस्याचे निवारण करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा चालु केला आहे. कोणाला टँकरने पाणी पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करावा.

महेश सुरेश विरले, सरपंच कोल्हारे ग्रामपंचायत
Exit mobile version