। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान नळपाणी योजनेसाठी नेरळ जवळील कुंभे येथे उल्हास नदीवरून होणारा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गेली चार दिवस माथेरान मध्ये होणारा पाणीपुरवठा शार्लोट लेक मधून होत आहे. दरम्यान, माथेरान मध्ये सध्या पर्यटन हंगाम असून पर्यटकांसाठी अधिकच पाणी साठा आवश्यक असल्याने पाणी पुरवठा नेरळ कुंभे येथून होणे महत्वाचे आहे. मात्र कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने चार दिवसापासून कामगारांचा संप माथेरान साठी न परवडणारा असाच आहे. तर दुसरीकडे माथेरान नळपाणी योजनेतून माथेरान डोंगरातील ज्या चार आदिवासी वाद्यांना पिण्याचे पाणी पुरविले जाते त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
माथेरान या पर्यटन स्थळाची नळपाणी योजना तेथील शार्लोट लेक मधील पाण्यावर तसेच नेरळ कुंभे येथे उल्हासनदीचे पाणी जलवाहिनी मधून माथेरान पर्यंत नेण्यात येते.माथेरान डोंगरातून जाणारे जलवाहिनी लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणे नळपाणी योजना तयार करताना कुंभे येथील उद्भव पासून जुम्मापट्टी आणि वॉटर पाईप अशा दोन ठिकाणी जलवाहिनीतून येणारे पाणी वेगाने माथेरान मध्ये जलशुद्धीकरण केंद्र येथे पोहचावे यासाठी पंप हाऊस बनविण्यात आले आहेत.ते पंप हाऊस ऑपरेट करणारे आणि कुंभे येथे पाणी सोडण्याचे काम करण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून स्थानिक तरुण काम करतात.कंत्राटी तत्वावर काम करणारे ते 17 कामगार हे जुम्मापट्टी,माणगाव वाडी,कुंभे येथील स्थानिक भूमिपुत्र आहेत.त्या कामगारांवर माथेरान नळपाणी योजनेचे उल्हासनदी येथून माथेरान येथील पे मास्टर पार्क भागात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचवण्याची जबाबदारी असते.
माथेरान नळपाणी योजनेसाठी महत्वाची भूमिका बजावणारे कामगार यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने या कंत्राटी कामगारांनी नळपाणी योजनेचे काम बंद केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे उल्हासनदी येथून माथेरान कडे जाणारे पाणी चार दिवसापासून सोडले गेले नाही.त्याचा परिणाम माथेरान मधील पर्यटन हंगामावर होण्याची शक्यता आहे. जीवन प्राधिकरणाने तात्काळ कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे.त्या 17 कामगारांनी नेरळ ग्रामपंचायत मधील पंप हाऊस जुम्मापट्टी,कुंभे येथील उद्धव पंप या ठिकाणी कामबंद आंदोलन चौथ्या दिवशी सुरु ठेवले आहे.
माथेरान नळपाणी योजनेच्या जलवाहिन्या नेरळ ग्रामपंचायत मधून जात असल्याने स्थानिक आदिवासी वाद्यांना या जलवाहिनी मधून पिण्याचे पाणी दिले जाते.जुम्मापट्टी,धनगर वाडा,धसवाडी आणि माणगाव वाडी या चार ठिकाणी मागील तीन दिवस पाणी गेले नाही आणि त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांना वणवण भटकावे लागत आहे.
माथेरान जीवन प्राधिकरणाने कामगारांचा प्रश्न निकाली काढून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत संपर्क केला आहे.तर पाणीपुरवठ्याबाबत शार्लोट लेक मध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढणायचे काम मंजूर केले असून ते लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. –
सुरेखा भणगे- प्रशासक,माथेरान गिरिस्थान नगरपरिषद
त्या 17 कामगारांचा प्रश्न पगाराबद्द;ल असून संबंधित यांना आजच तो प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माथेरान शहरातील शार्लोट लेक मधील पाण्याचा साठा कमी झाला आहे आणि त्यात सलग आठ दिवस पाणी उचलले गेल्यास लेक कोरडा होण्याची शक्यता आहे.
– एस ए भोसले- उपअभियंता







