पोयनाड नवेनगर येथे पाणीपुरवठा योजना; चित्रा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

| पोयनाड | वार्ताहर |

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंर्तगत पोयनाड येथे पोयनाड, नवेनगर गावाकरिता मंजूर झालेल्या योजनेचे भूमिपूजन जि.प.च्या माजी सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते (दि.14) पोयनाड, नवेनगर येथे करण्यात आले.

देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे, हे केंद्र सरकारचे धोरण आहे. केंद्र सरकार जलजीवन मिशन योजनेचा पोयनाड, पेझारी, शहापूर, नवेनगर इत्यादी गावातील नागरिकांना लाभ व्हावा यासाठी चित्रा पाटलांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

पोयनाड, नवेनगर येथे चित्रा पाटलांच्या हस्ते पाण्याच्या टाक्यांचे भूमिपूजन (दि.14) पार पडले. त्यानंतर पोयनाड ग्रामपंचायत कार्यालयात स्वागत समारंभ पार पडला. कार्यक्रमासाठी चित्रा पाटील, पोयनाड ग्रामपंचायत सरपंचा शकुंतला काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर चवरकर, माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य कल्पना राऊत, माजी सरपंच भूषण चवरकर, पोयनाड व्यापारी अध्यक्ष प्रकाश जैन, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार चवरकर, नारायण म्हात्रे, विक्रम जैन, विजेंद्र तावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चित्रा पाटील म्हणाल्या की, ‘पोयनाडमधील लोक जागरुक आहेत. याचा अनुभव बाजारपेठेतील रस्त्याच्या वेळी आला. आ. जयंत पाटील यांनी पोयनाडकरांना दिलेले रस्त्याचे आश्‍वासन पूर्ण केले. काम सुरू असताना मला रस्त्याच्या कामाविषयी ग्रामस्थ, व्यापार्‍यांचे सूचना व तक्रारीचे फोन यायचे, त्याची मी दखल घेतली. आ. जयंत पाटील यांनी जातीने लक्ष घातले, त्यामुळे चांगला रस्ता तयार झाला. त्याप्रमाणे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम चांगल्या प्रकारे झाले पाहिजे व लवकर पूर्ण झाले पाहिजे, हा माजी आ. पंडित पाटलांचा आग्रह आहे.

पोयनाड शेकापक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली. आता आमदार आपला नसला तरी विकासकामे थांबणार नाहीत. आपण विकासकामे करू शकतो. भूषण चवरकर शेकापक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. ही ओळख त्याची करून द्यावी, असे मला वाटत नाही. शेकापक्षासाठीच काम, विकासकामातील तत्परता हीच त्याची खरी ओळख आहे, असे चित्रा पाटील म्हणाल्या. यावेळी भूषण चवरकर, सुधीर चवरकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेद्र केळुसकर यांनी केले.

Exit mobile version