। नेरळ । प्रतिनिधी ।
वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे सर्वत्र विजेचे खांब कोसळले आहेत. त्यात माथेरान या थंड हवेचे ठिकाणी पाणी पुरवठा करणार्या उल्हास नदी येथील पंप हाऊस वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस बंद होते. तर त्याच माथेरान पंप हाऊस चे बाजूला नेरळ ग्रामपंचायतचे नळपाणी योजना यांचे पंप हाऊस आहे. मात्र, नेरळ ग्रामपंचायतीने तब्बल तीन दिवस जनरेटरचा वापर करून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला आहे, तर माथेरान नळपाणी योजनेकडे अशी व्यवस्था नसल्याने. आज तीन दिवसांनी माथेरानसाठी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता लटपटे यांच्या उपस्थितीत विशेष बाब म्हणून अतिरिक्त वीज पुरवठा माथेरान आणि नेरळ नळपाणी योजनांसाठी उपलब्ध करून दिल्याने पंप हाऊस येथे वीज पोहचली आहे.
कर्जत तालुक्यात वादळी वार्याने मोठे नुकसान केले आहे. अवकाळी सोबत आलेल्या वादळी वार्याने 250 विजेचे खांब कोसळले आहेत. (दि.15) मे रोजी जिते नेवाली परिसरात वादळ आले होते. त्यावेळी कोसळलेले विजेचे खांब पूर्ववत करण्याची कामे महावितरणकडून सुरू होती. त्यावेळी दुपारी कोणत्याही क्षणी वीज पुरवठा पूर्ववत होईल अशी स्थिती असताना वादळ आले आणि महावितरणकडून दोन दिवस प्रचंड मेहनतीने उभारलेले विजेचे खांब पुन्हा कोसळले. त्याचवेळी मुख्य वीज वाहिनीवरील अनेक खांबदेखील वादळात कोसळले. नेरळ ते कशेळे भागातील वीज (दि.14) मे पासून गायब आहे. त्यात वाकस परिसरात तब्बल 30 मुख्य वाहिनीचे विजेचे खांब कोसळल्याने कळंबोली उपकेंद्र येथून येणारा वीज पुरवठा वाकस पुलाचे पुढे येणे बंद झाले. जिते, आंबिवली, कुंभे या भागात तीन दिवस वीज खंडित असताना वादळ आले आणि पुन्हा पूर्वीसारखी स्थिती निर्माण झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी मध्यरात्र तीन वाजेपर्यंत महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी यांनी प्रयत्नांची शर्थ करून नेरळ परिसरातील वीज पुरवठा मध्यरात्री सुरू केला.
नेरळ आणि माथेरान नळपाणी योजना यांचे पंप हाऊस असलेल्या उल्हास नदीवरील पंप हाऊस येथे असलेले विशेष फिडर हे काम करीत नव्हते. शुक्रवारी सकाळी महावितरणचे कार्यकारी अभियंता लटपटे हे पेण येथून नेरळ येथे आले. नेरळ कुंभे येथे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली नळपाणी योजना अवलंबून असलेल्या कुंभे पंप हाऊस येथे विशेष फिडरद्वारे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. उपअभियंता प्रकाश देवके, सहायक उपअभियंता प्रशांत मोडक यांनी त्यानुसार कार्यवाही करीत दुपारी बारापूर्वी माथेरान आणि नेरळ नळपाणी योजना असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे माथेरानसाठी तब्बल तीन दिवसांनी नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. माथेरानसाठी पूर्वी दररोज 21-22 तास पंपिंग सुरू असते. त्यामुळे आज सुरू झालेला पाणी पुरवठा लक्षात घेता माथेरानमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी पोहचण्यास आणखी काही तास लागणार आहेत. कारण माथेरानमध्ये देखील वीज नसल्याने अखंडित वीज पुरवठा नसल्याने पाणी पूर्ण क्षमतेने माथेरान येथील जलशुध्दीकरण केंद्रावर पोहचण्यास अवधी लागणार आहे. मात्र माथेरान येथे असलेले पर्यटन स्थळ आणि तेथे उन्हाळयात होणारी गर्दी लक्षात घेवून आवश्यक असलेली वीज खंडित होणार नाही. याची काळजी महावितरण घेत आहे अशी माहिती उपअभियंता प्रकाश देवके यांनी दिली.
ग्रामपंचायतीकडून दररोज 60 हजाराचे डिझेल उल्हास नदीवरील कुंभे येथून नेरळ ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना राबविली आहे. उल्हास नदीवरील कुंभे येथे तीन दिवस वीज पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नेरळ ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट येणार नाही यासाठी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने जनरेटरचा वापर करून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार (दि.14) मे पासून नेरळ ग्रामपंचायत दररोज 55-60 हजाराचे डिझेल खरेदी करून जनरेटरचे सहाय्यक नेरळ गावांसाठी अखंडित पाणी पुरवठा करीत आहे. त्यामुळे नेरळ गावात वीज नाही आणि तरी देखील पाणी ग्रामस्थांना मिळत आहे, असे नियोजन नेरळ ग्रामपंचायतीने केले. माथेरान आणि नेरळ नळपाणी योजना यांचे पंपहाऊस हे बाजू बाजूला असताना देखील पंपहाऊस परिसरात वीज नसताना नेरळ ग्रामपंचायतीचे नळपाणी योजना कार्यरत असल्याचे कौतुक होत आहे. सर्वांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी नेरळ ग्रामपंचायत दररोज डिझेल खरेदी करण्यासाठी रोख पैसे आमच्याकडे नसतात. तरी देखील आम्हाला ग्रामस्थांसाठी ती व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांनी दिली आहे.