तक्रारीनंतर काही तासातच अनधिकृत जलवाहिन्या उद्ध्वस्त
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
वाढत्या उष्णतेमुळे एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. मात्र, त्याच वेळेला कळंबोली वसाहतीत तयार झालेल्या एका अनधिकृत झोपडपट्टीत मात्र 24 तास पाण्याचा पुरवठा होत असून, सिडकोने पाणीपुरवठ्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीतून राजरोसपणे पाणीचोरी केली जात असल्याची तक्रार कृषीवलच्या प्रतिनिधीने करताच काही तासाच्या आतच संबंधित विभागाने धडक कारवाई करीत अनधिकृत नळवाहिन्या उखडून काढल्या. याबाबत कृषीवलचे सर्व स्तरातून आभार व्यक्त होत आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदादेखील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे. पनवेल पालिका हद्दीतील रोडपाली वसाहतीत देखील सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. सिडकोच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या या वसाहतीला पाणी पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीला अनधिकृतपणे जोडणी देऊन परिसरात निर्माण झालेल्या झोपडपट्टीला पाणी पुरवठा केला जात असल्याने अधिकृतपणे जोडणी घेऊन वास्तव्य करणार्या नागरिकांना यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जल वाहिनी फोडून पाणीचोरी करणार्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
अनधिकृतपणे जोडणी घेऊन पाणीचोरी केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई करुन जोडण्या तोडल्या जातात. मात्र, त्यानंतरदेखील पाणीचोरी केली जात असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.
दररोज शेकडो लीटर पाणी वाया
जलवाहिनी खंडित करुन पाणीचोरी करण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या वारंवार खंडित होत असल्याने दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.
झोपडपट्टीला सरक्षण कोणाचं?
अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या या झोपडपट्टीचे गणेश नगर रहिवासी संघ म्हणून नुकतच नामकरण करण्यात आलेले आहे. यामुळे या झोपडपट्टीला नक्कीच कोणाच तरी संरक्षण असल्याची चर्चा असून, अनधिकृत झोपडपट्टीला संरक्षण देणारी व्यक्ती कोण याचा शोध घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रोडपाली विभागाला पाणी पुरवठा करण्यासाठी वापरात असलेल्या जलवाहिन्या तोडून पाणीचोरी केली जात असल्यास त्यावर कारवाई करण्याची मागणी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
अमर पाटील,
माजी नगरसेवक.
जलवाहिनीला बेकायदेशीर जोडणी करुण पाणी चोरी केली जात असल्याबद्दल माहिती घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्याशी संपर्क साधल्यानंतर काही तासातच जोडणी खंडित करण्यात आली.
प्रफुल्ल देवरे,
पाणीपुवठा अधिकारी