पाली भूतीवली धरणातून पाण्याची चोरी; पाटबंधारे विभाग अनभिज्ञ

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणीटंचाई ग्रस्त भागातील पाण्याची समस्या दूर व्हावी आणि तेथील परिसर ओलिताखाली यावा म्हणून शासनाच्या पाटबंधारे विभागाने पाली भुतीवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प बांधला. हा परिसर हिरवागार करण्यासाठी बांधलेल्या या धरणातील पाण्याची चोरी होत असून पाटबंधारे विभागाला त्याची साधी माहिती देखील नाही. दरम्यान,पाणी चोरी होत आहे अशी तक्रार आल्याने पाटबंधारे विभाग यांच्याकडून धरण परिसराची पाहणी केली जाणार आहे.

पाली भूतिवली गावाजवळ शासनाने 1980 साली लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यासाठी भूमिपूजन केले होते मात्र या प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामाला 1998 मध्ये सुरुवात झाली होती. या धरणात 2003 पासून पाणी अडविले गेले असून ते पाणी शेतीसाठी वापरले जावे यसाठी आवश्यक असलेले कालवे बांधण्यात आले नव्हते आणि त्यामुळे गेली अनेक वर्षे धरणातील पाण्याचा साठा मृत अवस्थेत आहे. त्यामुळे तेथील पोद्ददार गृह प्रकल्प कडून पाण्याची मागणी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने अटी शर्ती घालून पिण्याचे पाणी उचलण्याची परवानगी दिली होती. सध्या संबंधित पाणी ग्राहकाकडून पाटबंधारे विभाग वर्षाला साधारण साडे तीन लाखाचे पाणीपट्टी कर आकारणी करीत आहे. मात्र आपल्या मालकीच्या जागेत असलेल्या या धरणावर पाटबंधारे विभाग कडून दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या धरण परिसरात टेन्ट उभारून रात्रीचा मुक्काम तसेच उन्हाळ्यात रात्री येवून राहण्याचे प्रकार मुम्बई येथील लोकांकडून सुरू आहेत.

धरण परिसरात येण्यास बंदी असताना देखील पावसाळ्यात मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात आणि दरवर्षी अपघात होऊन मृत्यू देखील होत असतात. मात्र आता तर त्या धरणात जलवाहिनी टाकून पाण्याची चोरी दररोज सुरू आहे. सध्या तेथील ग्रामपंचायत मधील नळपाणी योजना या धरणातून पाझरून जाणारे पाणी उचलून आपल्या गावी नेणारी योजना राबवत आहेत. मात्र स्थानिक परिसरातील बांधकाम व्यवसायिक आणि फार्म हाउस यांच्याकडून थेट धरणाच्या जलाशयात जलवाहिनी टाकून पाणी उचलून नेले जात आहे. ही पाण्याची चोरी मागील काही महिने सुरू असून या पाण्याबद्दल पाटबंधारे विभागाला कोणतीही माहिती नाही. तीन ते चार पंप तेथे पाण्याचा उपसा करीत असून पाण्याची उचल सुरू असताना पाटबंधारे विभागला कोणतीही माहिती नसल्याने स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून संशय व्यक्त केला जात आहे. या धरणाचे शाखा अभियंता श्रीयोग भुटावळे यांनी तत्काळ संबंधित परिसरात फिरून पाहणी केली जाईल आणि कोणी पाण्याची चोरी करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पाली भुतीवली धरण परिसरात आमच्याकडे कोणीही कामगार देखरेख करण्यासाठी नियुक्त नाही. त्याचवेळी तेथे कोणतेही कार्यालय नाही आणि त्यामुळे धरणाची मालकी असून देखील आमचे सध्या नियंत्रण नाही. मात्र शाखा अभियंता यांना तत्काळ पाहणी करण्यास सांगितले आहे. पाण्याची चोरी करण्यासाठी पंप असतील तर ते काढून टाकण्यात येतील आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

एस डी शिंदे, उप अभियंता पाटबंधारे विभाग कर्जत
Exit mobile version